पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र एकाचवेळी डागली होती. यात १२०० इस्रायली नागरिकांचा बळी गेला, तर २५३ नागरिकांचे अपहरण करण्यात आले हाेते. अपहरण करुन ओलीस ठेवलेल्या इस्रायली महिलांवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झाले. अजूनही हे अत्याचार सुरू आहेत, असे संयुक्त राष्ट्रांनी ( United Nations) म्हटले आहे. हे अत्याचार सिद्ध करणारे पुरेसे पुरावे असल्याचेही संयुक्त राष्ट्रांच्या अधिकारी प्रमिला पॅटेन यांनी स्पष्ट केले आहे.
संघर्षग्रस्त भागांतील लैंगिक अत्याचार विरोधी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या विशेष समितीच्या पॅटेन प्रमुख आहेत. पॅटेन आणि त्यांच्या टीमला ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्यात इस्रायली महिलांवर लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ झाल्याचे पुरावे मिळून आले आहेत. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या महिलांवर लैंगिक अत्याचारही केल्याचे आरोप झाले होते, या आरोपांना दुजोरा देणारा हा पहिलाचा पुरावा मानला जात आहे.
पॅटेन आणि त्यांच्या टीमने २९ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या काळात इस्रायलला भेट दिली. ७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यात झालेल्या लैंगिक अत्याचारांची माहिती आणि पुरावे जमा करण्याचे काम या टीमकडे होते. या समितीने २४ पानांचा अहवाल सादर केला आहे. या टीमने इस्रायलमधील संस्थां, ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचे साक्षीदार यांच्या भेटी घेतल्या, तसेच ५० तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग ही तपासले. हमासने महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप फेटाळले होते.