PM Modi : पंतप्रधान मोदी उद्या किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता जारी करणार | पुढारी

PM Modi : पंतप्रधान मोदी उद्या किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता जारी करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) मंगळवार आणि बुधवारी केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते तीन राज्यांमध्ये २४ हजार कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. उद्या (दि.२८) पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (Kisan Samman Nidhi) १६ वा हप्ता जारी करणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) मंगळवारी केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला (VSSC) भेट देणार आहेत. या क्षेत्रातील तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी येथे सुमारे १८०० कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करतील. भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेतील ‘गगनयान’च्या प्रगतीचाही मोदी आढावा घेणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी सांगितले.

पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्रातील ५.५ लाख महिला बचत गटांना (SHGs) ८२५ कोटी रुपयांचा निधी वितरित करतील. ते महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्डचे वितरण करतील आणि ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास योजना सुरू करतील. १३०० कोटींहून अधिक किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचेही पंतप्रधान येथे उद्घाटन करतील. यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button