वायनाडमध्ये राहुल गांधींविरुद्ध भाकपच्या ॲनी राजा यांना उमेदवारी, इंडिया आघाडी पुन्हा विस्कटली? | पुढारी

वायनाडमध्ये राहुल गांधींविरुद्ध भाकपच्या ॲनी राजा यांना उमेदवारी, इंडिया आघाडी पुन्हा विस्कटली?

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राहुल गांधींच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. वायनाडसोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्याविरुद्ध पन्नियान रवींद्रन यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुन्हा विरोधकांच्या इंडीया आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आगामी लोकसभेसाठी एकुण चार उमेदवार घोषित केले आहेत.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ज्येष्ठ नेत्या ॲनी राजा यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली आहे. या ठिकाणाहून काँग्रेस नेते राहुल गांधी खासदार आहेत. केरळच्या सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीसोबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा दुसरा सर्वात मोठा आघाडीचा भागीदार आहे. दरम्यान, ॲनी राजा या वेळोवेळी इंडिया आघाडीत समजुतदारपणाची भुमिका घेणारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांच्या पत्नी आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने एकुण चार उमेदवार घोषित केले असुन वायनाडमधुन ॲनी राजा, तिरुवनंतपुरममधुन पन्नियन रवींद्रन, त्रिशूर येथुन माजी कृषी मंत्री वीएस सुनील कुमार आणि मवेलिकारा येथुन अरुण कुमार यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देण्यात आली.

इंडिया आघाडी पुन्हा विस्कटली?

केरळच्या वायनाड मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी खासदार आहेत. तिरुवनंतपुरममधुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर खासदार आहेत. या दोन महत्वाच्या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने थेट काँग्रेसविरुद्ध उमेदवार दिले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीत पुन्हा फाटाफुट झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या ॲनी राजा यांना वायनाड मतदारसंघातून तर पक्षाचे वरीष्ठ नेते आणि माजी खासदार पन्नियान रवींद्रन यांना तिरुवनंतपुरममधून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आधी आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष तसेच तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या घडामोडीवरून इंडिया आघाडी विस्कटल्याचे बोलले जात होते. तो तिढा सुटत नाही तोच हा नवा प्रकार इंडिया आघाडीत घडला आहे.

ॲनी राजा म्हणतात…

वायनाडमधून उमेदवारी दिल्याबद्दल ॲनी राजा म्हणाल्या की, “भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दीर्घकाळापासून डाव्या लोकशाही आघाडीसोबत चार जागांवर निवडणूक लढवली आहे. यावेळीही पक्षाने चार मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. केरळमध्ये लढत डावी लोकशाही आघाडी आणि संयुक्त लोकशाही आघाडी यांच्यात आहे. त्यामुळे यात नवीन काही नाही. परिस्थिती आधी होती तशीच आहे आणि काहीही बदललेले नाही. यापुर्वीही पक्षाने राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढली आहे.”

Back to top button