Stock Market Closing Bell | बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स पुन्हा ७२ हजारांवर, निफ्टी २१,९०० पार | पुढारी

Stock Market Closing Bell | बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स पुन्हा ७२ हजारांवर, निफ्टी २१,९०० पार

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांदरम्यान गुरुवारी शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी राहिली. सेन्सेक्स आज २२७ अंकांनी वाढून ७२,०५० वर बंद झाला. तर निफ्टी ७० अंकांच्या वाढीसह २१,९१० वर स्थिरावला. क्षेत्रीय आघाडीवर FMCG वगळता इतर सर्व निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यवहार केला. बीएसई मिडकॅप ०.९३ टक्क्याने आणि स्मॉलकॅप निर्देशांक १.२४ टक्क्यांनी वाढला.

सेन्सेक्सवर एम अँड एम, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एसबीआय, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स हे सर्वाधिक वाढले. तर ॲक्सिस बँक, आयटीसी, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर हे घसरले.

निफ्टीवर एम अँड एम, बीपीसीएल, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, ओएनजीसी हे टॉप गेनर्स राहिले. तर ॲक्सिस बँक, अपोलो हॉस्पिटल, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया हे शेअर्स घसरले.

बँक निफ्टी, आयटी हेही आज वाढले. बँक निफ्टी आज ४६,०२७ वर खुला झाला होता. तो आज ४६,२९७ पर्यंत वाढला. त्यानंतर तो ४६,२७० वर स्थिरावला. बँक निफ्टीवर फेडरल बँक, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, एसबीआय, एचडीएफसी बँक हे २ ते ५ टक्क्यांदरम्यान वाढले. तर ॲक्सिस बँक, AU Small Finance Bank हे घसरले.

Paytm shares ची वाईट अवस्था, २७ हजार कोटींचा फटका

डिजिटल पेमेंट फर्म पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात ५ टक्क्यांनी घसरुन ३२५ रुपयांपर्यंत खाली आले. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (FEMA) अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई सुरू केल्यानंतर पेटीएमचे शेअर्स घसरले. रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कडक कारवाई केल्यापासून पेटीएम शेअर्सला अनेकवेळा लोअर सर्किट्स लागले. NSE वर पेटीएमचे शेअर्स (One 97 Communications) ५ टक्क्यांनी घसरून ३२५ रुपयांच्या निचांकी पातळीवर आले. RBI ने पेटीएम वॉलेट असलेल्या पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर गेल्या ११ दिवसांत पेटीएमला सुमारे २७ हजार कोटींचा फटका बसला. (One97 Communications Share Price)

‘ऑइल इंडिया’ची उच्चांकी पातळी

ऑइल इंडिया लिमिटेडच्या शेअर्सनी गुरुवारच्या व्यवहारात विक्रमी उच्च पातळी गाठली. हा शेअर्स आज १२ टक्क्यांनी वाढून ५६३ रुपयांवर पोहोचला. ऑइल इंडियाने एकत्रित निव्वळ नफ्यात वाढ नोंदवली असून तो २,६०८ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. या पार्श्वभूमीवर Oil India च्या शेअर्सने मोठी उसळी घेतली. (Oil India shares)

M&M चे शेअर्स सर्वकालीन उच्चांकांवर

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ​​शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक वाढून १,७६४ रुपयांवर पोहोचले. या कंपनीने निव्वळ नफ्यात ६० टक्क्यांची वाढ नोंदवल्याच्या घोषणेनंतर या शेअर्सने आज सर्वकालीन उच्चांक गाठला. (Shares of Mahindra and Mahindra)

जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत

काल बुधवारी अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी राहिली होती. डाऊ जोन्स, नॅसडॅक कंपोझिट आणि S&P ५०० निर्देशांक १ टक्क्यांपर्यंत वाढले. आज सकाळी आशिया-पॅसिफिक बाजारही वधारले. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक आज १.२१ टक्के वाढून ३८,१५७ वर बंद झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.२५ टक्क्यांनी घसरला.

 हे ही वाचा :

Back to top button