Stock Market | तेजीच्या मार्गावर वाटचालीचे बाजाराचे संकेत | पुढारी

Stock Market | तेजीच्या मार्गावर वाटचालीचे बाजाराचे संकेत

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

निफ्टी 50-21782.50 (+0.39 %), सेन्सेक्स 71595.49 (-0.07%), निफ्टी बँक 45634.55 (-1.20%) असा जवळजवळ ‘जैसे थे’ कारभार गत सप्ताहात बाजाराचा होता. निफ्टी बँक सव्वा टक्क्याने घसरला, तरी निफ्टी PSU Bank इंडेक्स मात्र आठवड्याचा स्टार परफॉर्मर ठरला. (Stock Market)

इंडियन ओव्हरसीज बँक (सध्याचा भाव रु. 71.10), पंजाब आणि सिंद बँक (सध्याचा भाव रु. 66.60) आणि युको बँक (सध्याचा भाव रु. 60.55) या तीन शेअर्सनी गेल्या एक महिन्यामध्ये 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पेन्नी शेअर्सच्या मागे लागून शेअर बाजाराला जुगाराचे स्वरूप आणणार्‍या ट्रेडर्सनी आणि गुंतवणूकदारांनी वरील दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक करावी.

एचडीएफसी बँकेची घसरण गत सप्ताहातही सुरूच राहिली. सव्वा चार टक्क्यांनी घसरून तो शुक्रवारच्या सत्रात 1400 रुपयांच्याही खाली गेला होता; परंतु अंतिमतः 1403.60 वर बंद झाला.

बँक ऑफ इंडियाने सर्व आघाड्यांवर उत्कृष्ट Q3 निकाल देऊनही हा शेअर आठवड्यात 5.61 टक्के घसरला. रु. 137.25 वर मिळणारा हा शेअर इथून पुढे उत्कृष्ट खरेदी ठरेल.

निफ्टी एनर्जीनेही बाजाराला चांगली साथ दिली. सप्ताहात हा इंडेक्स पावणे सहा टक्क्यांनी वाढला. इंडियन ऑईल (रु. 182.50), सीपीसीएल (रु. 614.30), अदानी ग्रीन (रु. 1880.70) आणि कोल इंडिया (रु. 456.20) हे शेअर्स सव्वा बारा ते 22 टक्के वाढले.

देशी गुंतवणूक संस्थांची (DII) खरेदी आणि परदेशी गुंतवणूक संस्थांची (FII) विक्री ही गेल्या कित्येक महिन्यांची गाथा गत सप्ताहात सुरूच राहिली. FII नी 5871.45 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली, तर DII नी 5325.73 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली.

ऑर्चिड फार्मा, ट्रेन्ट झोमॅटो, एलआयसी कमिन्स इंडिया, भारती एअरटेल या कंपन्यांनी अतिशय दमदार असे तिसर्‍या तिमाहीचे आर्थिक निकाल सादर केले. झोमॅटोने मागील वर्षाच्या याच तिमाहीमध्ये 347 कोटी रुपये तोटा दर्शवला होता; मात्र या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये कंपनीने 138 रुपये कोटी नफा कमविला आहे. निव्वळ उत्पन्नही 1948 कोटींवरून 3288 कोटी रुपयांवर गेले. शुक्रवारचा शेअरचा बंद भाव 149.10 रुपये आहे. येणार्‍या एक वर्षात हा शेअर 200 रुपयांपर्यंत गेला तरी 30 टक्के रिटर्नस मिळतील.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बहुप्रतीक्षित बैठक गुरुवारी पार पडली. सुमारे 100 टक्के तज्ज्ञांचे मत व्याज दर कमी होणार नाहीत असेच होते आणि झालेही तसेच. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता साडेसहा टक्के ठेवण्यात आला. GDP वाढीचा वेग वाढवून 7 टक्के करण्यात आला. किरकोळ महागाई 5.4 टक्क्यांवरून 4.5 टक्क्यांपर्यंत खाली येईल. भारतीय अर्थव्यवस्था अतिशय दमदार गतीने विकास पाळत आहे. ग्रामीण आणि शहरी Consumption वाढत आहे, असे निरीक्षण आरबीआयने नोंदवले, तरीही दिवसअखेर बाजार कोसळला. विशेषतः निफ्टी बँकने खोल बुडी मारली. कारण, काय तर बाजाराला दोन गोष्टींची अपेक्षा होती. एक म्हणजे निदान SLR मध्ये होईल आणि दुसरी म्हणजे भविष्य काळात रेपो रेट कमी करण्याचे काहीतरी सूतोवाच होईल. परंतु, या दोन्ही गोष्टी घडून न आल्यामुळे बाजाराने निराश सलामी दिली.

अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे सूतोवाच करताच ओलेक्ट्रा ग्रीनटेकने 2000चा आकडा पार केला. हिरो मोटो, टाटा पॉवर यांचे समाधानकारक निकाल हाती आले आहेत. (Stock Market)

Back to top button