विमा : सर्व रुग्णालयांत कॅशलेस उपचार | पुढारी

विमा : सर्व रुग्णालयांत कॅशलेस उपचार

जान्हवी शिरोडकर

आरोग्य विम्याची कॅशलेस पॉलिसी ठेवणारा व्यक्ती आता देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार करू शकणार आहे. मग, संबंधित रुग्णालय त्याच्या विमा कंपनीच्या यादीत असो किंवा नसो, जनरल इन्शूरन्स कौन्सिलने यासाठी ‘कॅशलेस एव्हरीव्हेअर’ नावाचे अभियान सुरू केले आहे.

आरोग्य विमा खरेदी करणार्‍या व्यक्तीस विमा कंपनीच्या यादीत असलेल्या रुग्णालयांची माहिती असतेच असे नाही. काही वेळा यादीत नसलेल्या रुग्णालयात दाखल व्हावे लागते आणि त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. काहीवेळा यादीतील रुग्णालय दूरवर असल्याने तेथे जाईपर्यंत रुग्णाचा जीवही धोक्यात सापडतो. त्याचवेळी आरोग्य आणीबाणीच्या काळात यादीतील रुग्णालय सापडतेच असे नाही. अशावेळी कॅशलेस उपचार होत नाही. पॉलिसीधारकांकडे पैसे फारसे नसतील, तर उपचारदेखील अडचणीत येतात. या सर्व स्थितीचा आढावा घेत जनरल इन्शुरन्स कौन्सिलने हेल्थ इन्शुरन्स कंपनींना सर्व रुग्णालयात कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना दिली आहे.

जनरल इन्शुरन्स कौन्सिलची स्थापना

विमा नियामक संस्था ‘इर्डा’ने केली आणि हे कौन्सिल विमा कंपनी, इर्डा आणि ग्राहक यांच्यात समन्वय प्रस्थापित करण्याचे काम करते. ‘जीआयसी’ने हा निर्णय घेण्यापूर्वी विमा कंपन्यांबरोबर बरीच चर्चा केली आणि सर्वसामान्य पॉलिसीधारकांच्या समस्यांची माहिती दिली. विमा कंपन्यांनीदेखील जीआयसीला सहकार्य करत नवीन सुविधा देण्याबाबत सहमती दर्शविली.

पूर्वीची सुविधा

नवा नियम येण्यापूर्वी आरोग्य विमा कॅशलेस पॉलिसी घेणारा व्यक्ती हा विमा कंपनीच्या लिस्टेड रुग्णालयात दाखल होत असेल, तर त्याला तेथे स्व:खर्चाने उपचार करून घ्यावा लागत असे. त्यानंतर पॉलिसीधारक हा आपला उपचाराचा खर्च रिम्बर्समेंटसाठी विमा कंपनीला पाठवत असे आणि सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर त्यानुसार त्याला पैसे परत मिळायचे.

संथ प्रक्रिया

लिस्टेड नसलेल्या रुग्णालयात उपचार केल्याने प्रारंभी स्वत: खर्च करावा लागतोच; परंतु ते पैसे विमा कंपनीकडून मिळवण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागत असे. त्याची औपचारिकता पूर्ण करण्यात बराच वेळ जातो. अनेकदा खर्च अधिक राहतो तेव्हा तेवढी रक्कम हाताशी असतेच असे नाही. अशा स्थितीत अडचणी येतात. परिणामी, आरोग्य विमा असूनही तो लिस्टेड दवाखान्यात नसल्याने त्याचा काहीच लाभ मिळत नाही. कसे तरी उपचार करून झाल्यानंतर ते पैसे मिळवण्यासाठी ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो त्याचा दावा करण्यासाठी सर्व पावत्या, डिस्चार्ड कार्ड या सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागते आणि एकही कागद नसेल, तर दाव्याची प्रक्रिया रेंगाळत राहते.

नवीन नियम

नव्या नियमानुसार आरोग्य विम्याची कॅशलेस पॉलिसी ठेवणारा व्यक्ती आता देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार करू शकणार आहे. मग, संबंधित रुग्णालय त्याच्या विमा कंपनीच्या यादीत असो किंवा नसो. जनरल इन्शुरन्स कौन्सिलने यासाठी ‘कॅशलेस एव्हरीव्हेअर’ नावाचे अभियान सुरू केले आहे. याप्रमाणे देशातील प्रत्येक रुग्णालयात कॅशलेस उपचार करता येणार आहे. नव्या नियमानुसार रुग्णालयात कॅशलेस उपचार होतील आणि ग्राहकांचा दावा मान्य करणे हे विमा कंपनीला बंधनकारक राहील. त्याचे पेमेंट कंपनी संबंधित रुग्णालयास अदा करेल.

48 तास अगोदर पूर्वसूचना

कॅशलेस पॉलिसीधारकाला नेटवर्कबाहेरील रुग्णालयात उपचार करायचे असेल, तर दोन दिवस अगोदर विमा कंपनीला त्याची माहिती देणे गरजेचे आहे. आणीबाणीच्या काळात उपचार घेत असाल, तर 48 तासांच्या आत विमाधारक हा आपण किंवा कुटुंबीय कोणत्या रुग्णालयात उपचार घेत आहे, हे सांगणे गरजेचे आहे.

कंपनी आणि ग्राहकांना लाभ

कॅशलेस उपचाराची सुविधा मिळाल्याने विमा कंपनीबरोबरच पॉलिसीधारकांनादेखील लाभ मिळणार आहे. नेटवर्कबाहेरील रुग्णालयांत उपचार केल्यास ग्राहकांना आपल्या विमा कंपनीला अनेक कागदपत्रे द्यावी लागतात. त्यानुसार विमा कंपनीदेखील रुग्णालयाकडून अहवाल मागवते. या सर्व प्रक्रियेत बराच काळ जातो. आता नव्या नियमांमुळे दोघांच्या वेळेची बचत होणार आहे.

रुग्णालयांना लाभ

नव्या सुविधेमुळे पंधरा बेड किंवा त्यापेक्षा अधिक खाटा असलेल्या रुग्णालयांना फायदा होणार आहे. त्यामुळे पंधरा खाटा असलेले पण विम्याच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या रुग्णालयांना लाभ मिळेल. काही वेळा नेटवर्कमध्ये नसल्याने रुग्ण अशा दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करत असत. आता नव्या नियमांमुळे रुग्णालयांचे उत्पन्न वाढेल आणि विमाधारकांना वेळेत आणि घराजवळ उपचार मिळणे सोयीचे जाईल.

रुग्णालयासाठी नियम

जनरल इन्शुरन्स कौन्सिलने विमा कंपन्यांबरोबरच रुग्णालयांसाठीदेखील काही नियम तयार केले आहेत. यानुसार पंधरा किंवा त्यापेक्षा अधिक खाटा असलेल्या रुग्णालयांत आरोग्य विमाअंतर्गत कॅशलेस उपचार करता येणार आहेत. त्याचबरोबर संबंधित रुग्णालय राज्य आरोग्य प्राधिकरणात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. विमा कंपनीच्या नेटवर्कबाहेरील रुग्णालयात उपचार घेतल्यास त्याचे बिल अधिक येईल आणि विमा कंपनी अधिक पैशाचे रिम्बर्संमेंट करेल असे वाटत असेल, तर तो विचार चुकीचा आहे. कारण, नवीन नियमांत म्हटले आहे की, आपण कोणत्याही रुग्णालयात उपचार केले, तर त्याचे बिल हे नेटवर्कमध्ये असलेल्या रुग्णालयांप्रमाणेच आकारले जाईल आणि त्याचा भरणा थेट रुग्णालयास होईल.

Back to top button