Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टीत घसरण कायम, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे उडाले १३ लाख कोटी | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टीत घसरण कायम, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे उडाले १३ लाख कोटी

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स आज ३१३ अंकांनी घसरून ७१,१८६ वर बंद झाला. तर आजच्या अस्थिर सत्रात निफ्टी १०९ अंकांच्या घसरणीसह २१,४६२ वर बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकात बँक, एफएमसीजी, आयटी, मेटल आणि पॉवर ०.३ ते १ टक्क्यांनी घसरले. तर ऑटो, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, गॅस आणि ऑईल आणि रियल्टी ०.३ ते ०.६ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. (Stock Market Closing Bell)

सेन्सेक्सवर काय स्थिती?

सेन्सेक्स आज ७१,०१८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७०,६६५ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स आज ३ टक्क्यांहून अधिक घसरून १,४८० रुपयांपर्यंत खाली आला. एनटीपीसीचा शेअर्सही ३ टक्क्यांनी घसरून २९९ रुपयांवर आला. टायटन, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, मारुती, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांदरम्यान घसरले. तर सन फार्मा, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, एम अँड एम हे शेअर्स वाढले.

LTIMINDTREE चे शेअर्स धडाधड कोसळले

एनएसई निफ्टीवर IT सेवा कंपनी LTIMINDTREE चे शेअर्स धडाधड कोसळले. LTIMindtree चे शेअर्स आज १० टक्क्यांनी घसरून ५,६०० रुपयांच्या निचांकी पातळीवर आले. डिसेंबर तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी कमाईच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. निफ्टीवरील टॉप लूजरमध्ये एनटीपीसी, एचडीएफसी बँक, टायटन, पॉवर ग्रिड या शेअर्सचाही समावेश होता. दरम्यान, सन फार्मा, टेक महिंद्रा, सिप्ला, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक या शेअर्सनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला.

तीन दिवसांत गुंतवणूकदारांना १३.२ लाख कोटींचा फटका

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, बीएसई सेन्सेक्स गुरुवारी सकाळी ८३५ हून अधिक अंकांनी घसरून ७०,६६५ पर्यंत खाली आला. ३० शेअर्सचा सेन्सेक्स त्याच्या ५२ आठवड्यांच्या ७३,४२७ च्या उच्चांकावरून २,७६० अंकांनी खाली आला आहे. त्याचप्रमाणे NSE चा निफ्टी ५० निर्देशांक दिवसभरात २८५ अंकांनी घसरून २१,२८५.५५ वर आला. निफ्टीने मंगळवारपासून ८४० अंक गमावले आहेत. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मंगळवारच्या ३८०.२३ लाख कोटींच्या तुलनेत गुरुवारी ३६७.०३ लाख कोटींपर्यंत खाली आले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना १३.२ लाख कोटींचा फटका बसला आहे.

एचडीएफसी बँक शेअर्समध्ये विक्रीचा दबाव, १.३ लाख कोटींचा फटका

एचडीएफसी बँक शेअर्समधील विक्रीचा दबाव आजही शेअर बाजारात दिसून आला. हा शेअर्स बीएसईवर आज सुमारे ३ टक्क्यांपर्यंत घसरून १,४८० रुपयांपर्यंत खाली आला. दरम्यान, गेल्या दोन सत्रांमध्ये हे शेअर्स जवळपास १२ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रात या निफ्टीवरील हेवीवेट शेअर्सने कालपासून १२ टक्क्यांच्या घसरणीनंतर सुमारे १.३ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल गमावले आहे. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आजची बहुतांश घसरण ही थेट एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या कमकुवत कामगिरीमुळे झाली आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्स ८.५ टक्क्यांनी घसरले होते. एचडीएफसी बँकेच्या शेअर्सची कालची घसरण ही मार्च २०२० नंतरची सर्वात मोठी राहिली होती.

परदेशी गुंतवणूकदारांचा पुन्हा विक्रीकडे कल

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी १०,५७८ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ४,००६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

कच्च्या तेलाच्या दरात वाढ

ओपेकने पुढील दोन वर्षांत जागतिक तेलाच्या मागणीत तुलनेने मजबूत वाढीचा अंदाज व्यक्त केल्याने आणि अमेरिकेतील थंडीमुळे तेल उत्पादनात अडथळा निर्माण झाल्याने गुरुवारी तेलाच्या किमती वाढल्या. ब्रेंट क्रूड फ्यूचर्सचा दर प्रति बॅरल ७८.१२ डॉलरवर आणि यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड फ्यूचर्स (WTI) ७२.८३ डॉलरवर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या 

 

Back to top button