अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सरकारी तिजोरीतून किती पैसे दिले? CM योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले…. | पुढारी

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सरकारी तिजोरीतून किती पैसे दिले? CM योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले....

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. २२ जानेवारी रोजी रामलल्‍लांच्‍या प्राणप्रतिष्‍ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत होणार आहे. आता राम मंदिर उभारणीसाठी सरकारने किती पैसे दिले?, या प्रश्‍नावर मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी उत्तर दिले आहे. ( CM yogi adityanath disclosed ram mandir construction fund by devotees )

 CM yogi adityanath : सर्व निधी रामभक्तांनी दिला

राम मंदिर उभारणीसाठी निधी कसा मिळाला, या प्रश्‍नावर बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शन, विश्व हिंदू परिषदेचे नेतृत्व आणि पूज्य संतांचे आशीर्वाद यातून रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारले जात आहे. अयोध्‍येतील राम मंदिराच्‍या उभारणीसाठी  उत्तर प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारने एक पैसाही दिला नाही. तसेच मंदिरातील कोणत्याही कामात हातभार लावला नाही. राम मंदिर उभारणीसाठीचा सर्व  निधी देशभरातील आणि जगभरातील रामभक्तांनी दिला आहे. ( CM yogi adityanath disclosed ram mandir construction fund by devotees )

मंदिर परिसराबाहेरील विकास कामे सरकारकडून

रामजन्मभूमी ट्रस्ट प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवून या मंदिराच्या उभारणीचे काम पुढे नेत आहे. अयोध्येत मंदिर परिसराबाहेर बांधकाम सुरू आहे, रेल्वे स्टेशनचे काम, विमानतळाचे बांधकाम, रस्त्याचे रुंदीकरण, पार्किंगची सुविधा. ही सर्व काम शासनाकडून होत असून शासनाच्या धोरणांनुसार होत आहेत, असेही यावेळी योगी आदित्‍यनाथ यांनी स्‍पष्‍ट केले.

राम मंदिरात येण्‍यापासून कोणालाही रोखलेले नाही

आदित्यनाथ म्हणाले की, “आम्ही श्री रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे श्रेय घेत नाही. आम्ही सेवक म्हणून मंदिरात जात आहोत. काँग्रेस, समाजवादी पक्षासह सर्वांनाच रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. त्यांना राम मंदिरात येण्यापासून कोणीही रोखलेले नाही. त्यांनी रामाचा सेवक म्हणून यावे, रामाचा सेवक म्हणून येईल त्याचे स्वागत आहे.” ( CM yogi adityanath disclosed ram mandir construction fund by devotees )

ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे माझे भाग्य

आम्ही रामाचे भक्त आणि रामाचे सेवक म्हणून मंदिरात उपस्थित राहू. या सोहळ्यास उपस्‍थित राहता येत असल्‍यामुळे आम्‍ही स्‍वत:ला भाग्‍यवान समजतो. ही वेळ ५०० वर्षांनंतर आली आहे. राम मंदिरासाठी 3 लाखांहून अधिक लोक शहीद झाले आणि 76 पेक्षा जास्तवेळा संघर्ष झाला. राम मंदिर आंदोलनाशी संबंधित लोक गोरखपीठात येत असत. परिणामी आज राम मंदिर सर्वांसमोर आहे. माझे गुरू आणि आजोबा या चळवळीत सहभागी झाले होते. आता या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार होईन, हे माझे भाग्य आहे, असेही मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी या वेळी नमूद केले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button