Ram Pran Pratishtha Ceremony : राम मंदिर परिसरात आज हाेणार मूर्तीचा प्रवेश | पुढारी

Ram Pran Pratishtha Ceremony : राम मंदिर परिसरात आज हाेणार मूर्तीचा प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क: रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा विधीचा आज (दि.१७) दुसरा दिवस. अयोध्येत मंगळवारपासून भगवान श्री रामलल्ला प्राणप्रिष्ठा विधीला सुरूवात झाली आहे. प्रायश्चित्त पूजा आणि कर्मकुटी पूजा संपन्न झाली. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि प्राणप्रतिष्ठाचे मुख्य यजमान डॉ.अनिल मिश्रा यांच्या हस्ते विधी पार पडले. आज रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात प्रवेश करणार असून, या मूर्तीचे परिसर भ्रमण केले जाणार असल्याची माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिले आहे. (Ram Pran Pratishtha Ceremony)

आज हाेणारे धार्मिक विधी

रामलल्लाच्या मूर्ती प्रवेश आणि भ्रमंतीनंतर आज अनेक धार्मिक विधी देखील होणार आहेत. यामध्ये आज (दि.१७) दुपारी १ वाजून २० मिनिटांनी जलयात्रा, तीर्थ पूजा, ब्राह्मण-बटूक-कुमारी-सुवासिनी पूजा, वर्धिनी पूजा, कलशयात्रा आणि भगवान श्री रामलला यांच्या मूर्तीची प्रसाद बनवण्यात येणाऱ्या परिसरात भ्रमण होईल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने स्पष्ट केले आहे. (Ram Pran Pratishtha Ceremony)

मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी २२ जानेवारीला उघडली जाणार

मंगळवार १६ जानेवारीपासून तपश्‍चर्या आणि कर्मकुटी पूजेने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात झाली. सलग सात दिवस हा विधी चालणार आहे. ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सुमारे तीन तास प्रायश्चित्त पूजा केली. यानंतर यजमानांनी शरयू नदीत स्नान केले. यानंतर मूर्ती उभारणीच्या जागेचे पूजन करण्यात आले. विष्णूची पूजा करून पंचगव्य आणि तूप अर्पण करून पंचगव्यप्राशन केले. द्वादशबद पक्षातून प्रायश्चित्त म्हणून दान केले. दशदानानंतर मूर्ती उभारण्याच्या ठिकाणी कर्मकुटी होम करण्यात आला. तसेच निवडलेल्या रामलल्ला मूर्तीचे शुद्धीकरण करताना तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आहे, ही पट्टी सोमवारी २२ जानेवारीला उघडली जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टने दिली आहे. (Ram Pran Pratishtha Ceremony)

जूनी मूर्तीदेखील नवीन मंदिराच्या गर्भगृहातच

रामल्लाची मूर्ती गुरुवार १८ जानेवारीला गर्भगृहातील नियुक्त आसनावर बसवण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या ७० वर्षांपासून पूजली जात असलेली सध्याची राम मूर्तीही नवीन मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. सोमवार २२ जानेवारीला रामलला अयोध्येतील मंदिरात विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. तसेच अनेक दिग्गज व्यकीदेखील या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होणार आहेत.

प्राणप्रतिष्ठा साेहळ्यातील धार्मिक विधी

१७ जानेवारी – मूर्तीचा मंदिर परिसरात प्रवेश
१८ जानेवारी – तीर्थपूजन, जलाधिवास आणि गंधाधिवास
१९ जानेवारी – औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवास
२० जानेवारी – शर्कराधिवास, फलधिवास, पुष्पाधिवास
२१ जानेवारी – मध्याधिवास, सायंकाळ शैय्याधिवास

Back to top button