जम्‍मू-काश्‍मीरमधील फुटीरवाद्यांना चाप..! ‘तेहरीक-ए-हुर्रियत’वर केंद्र सरकारची बंदी | पुढारी

जम्‍मू-काश्‍मीरमधील फुटीरवाद्यांना चाप..! 'तेहरीक-ए-हुर्रियत'वर केंद्र सरकारची बंदी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्र सरकारने आज (३१ डिसेंबर) जम्‍मू-काश्‍मीरमधील आणखी एका फुटीरवादी संघटनेला दणका दिला. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत तेहरीक-ए-हुर्रियत ( Tehreek-e-Hurriyat) या फुटीरतवादी संघटनेवर बंदी घालण्‍यात आली असल्‍याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्‍पष्‍ट केले आहे.. या संघटनेचे नेतृत्त्‍व फुटीरवादी नेते सय्‍यद अली शहा गिलानी यांच्‍याकडे होते.

Tehreek-e-Hurriyat चा देशविराेधी  कारवायांमध्‍ये सहभाग

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, “तेहरीक-ए-हुर्रियत ही फुटीरतवादी संघटना जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करण्यासाठीच्‍या कारवायांमध्ये सहभागी होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये अलिप्ततावादाला खतपाणी घालण्यासाठी हा गट भारतविरोधी प्रचार आणि सतत दहशतवादी कारवाया करत असल्याचे आढळले आहे,”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्धच्या धोरणानुसार, देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली कोणतीही व्यक्ती किंवा संघटना ताबडतोब उधळून लावली जाईल, असेही अमित शहा यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानींनी केली होती संघटनेची स्‍थापना

जम्मू-काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी २००४ मध्ये तहरीक-ए-हुर्रियत या संघटनेची स्थापना केली होती. गिलानी यांच्यानंतर तेहरीक-ए-हुर्रियतचे अध्यक्ष मुहम्मद अशरफ सेहराय होते. त्यांचेही 2021 मध्ये निधन झाले आहे. ही संघटना हुर्रियत कॉन्फरन्सची सहयोगी संघटना आहे. हुर्रियत कॉन्फरन्स हा जम्मू-काश्मीरमधील २६ संघटनांचा एक गट आहे, याची स्थापना १९९३ मध्ये झाली होती. हुर्रियत कॉन्फरन्समध्ये पाकिस्तान समर्थक आणि फुटीरतावादी समजल्या जाणाऱ्या अनेक संघटनांचा समावेश आहे. यामध्ये जमात-ए-इस्लामी, जेकेएलएफ आणि दुख्तरन-ए-मिल्लत इत्यादींच्या नावांचा समावेश आहे. 2005 मध्ये हुर्रियत कॉन्फरन्स दोन गटात विभागली गेली. मिरवाईज उमर फारुख यांना त्यांच्या मध्यम गटाचे नेतृत्व मिळाले. या अन्‍य गटाचे नेतृत्व सय्यद अली शाह गिलानी करत होते. गिलानीच्या मृत्यूनंतर हुर्रियत कॉन्फरन्सचे नेतृत्व मसरत आलम भट यांच्याकडे आले. भट हे भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक अजेंडा चालवण्यासाठी ओळखले जातात. भट सध्या तुरुंगात असून त्यांचा पक्ष ‘मुस्लिम लीग ऑफ जम्मू अँड काश्मीर’ ही 27 डिसेंबर रोजी प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित करण्यात आली होती.

गुरुवार, २८ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम गट) या फुटीरतावादी संघटनेवर बंदी घातली होती. मसरल आलम ( Masarat Alam ) याच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीग बेकायदेशीर घोषित करण्यात आल्‍याले अमित शहा यांनी स्‍पष्‍ट केले होते. मसरत आलम भट्ट गेल्या चार वर्षांपासून दिल्लीच्या तिहार कारागृहात आहे. राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ( एनआयए) काश्मिरी कट्टरपंथी फुटीरतावादी गट ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचा अध्यक्ष मसरत आलम यांच्यावरही दहशतवादी निधीसाठी गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच त्याला 2008 आणि 2010 मध्ये काश्मीर खोऱ्यातील कथित भूमिकेसाठी अटक करण्यात आली होती. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलमवर 27 गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button