Target Killing: जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये २४ तासांत दुसरा दहशतवादी हल्‍ला, परप्रांतीय कामगाराची गोळ्या झाडून हत्‍या | पुढारी

Target Killing: जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये २४ तासांत दुसरा दहशतवादी हल्‍ला, परप्रांतीय कामगाराची गोळ्या झाडून हत्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्‍मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे २४ तासांमध्‍ये दुसरा दहशतवादी हल्‍ला झाला. आज उत्तर प्रदेशातील एका मजुराची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. यापूर्वी रविवारी दुपारी श्रीनगरमध्ये एका दहशतवाद्याने पोलीस निरीक्षकावर गोळ्या झाडल्या. पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( Target Killing )

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, पुलवामाच्या तुची नौपोरा भागात दहशतवाद्यांनी कामगाराला गोळ्या घातल्या. मुकेश असे या कामगाराचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. या हल्ल्यात कामगाराला आपला जीव गमवावा लागला. माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
मजूर मुकेश वीटभट्टीवर मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सोमवारी दुपारी सामान घेण्यासाठी दुकानात जात होतो. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरचे पोलिस डीजीपी दिलबाग सिंह यांनी दोन्ही हल्ल्यांचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, राज्यातील शांतता बिघडवणारे काही घटक आहेत. श्रीनगरमधील पोलीस निरीक्षक आणि पुलवामा येथील एका गरीब कुटुंबातील मुलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. तो परप्रांतीय मजूर काश्मीरमध्ये कामासाठी आला होता.

Target Killing : श्रीनगरमध्ये क्रिकेट खेळताना पोलीस निरीक्षकावर गोळी झाडली

रविवारी संध्याकाळी श्रीनगर शहरातील ईदगाह परिसरात एका दहशतवाद्याने अगदी जवळून क्रिकेट खेळणाऱ्या पोलीस निरीक्षकाला लक्ष्य केले. त्‍यांच्‍यावर एकामागून एक तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले. त्यांना सौरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू आहेत. मसरूर अहमद वानी असे त्याचे नाव आहे.

दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात संकरित दहशतवाद्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Back to top button