नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : खलिस्तानी दहशतवादी पन्नु याने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी भारतात मोठा स्फोट करणार असल्याची धमकी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना दिली आहे. या धमकीनंतर खासदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहुन याविषयीची माहिती दिली आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून हेमंत पाटील यांना हा धमकीचा फोन आल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोलीचे लोकसभा खासदार असलेले हेमंत पाटील यांना दोन वेळा धमकीचा फोन आला. सर्वप्रथम १४ डिसेंबरला रात्री १० वाजता खासदार हेमंत पाटील यांना धमकीचा फोन आला. समोरुन बोलणारी व्यक्ती इंग्रजीत बोलत होती. त्याने बोलताना स्वतःचे नाव पन्नु सांगितले. २६ जानेवारीला भारतात मोठा स्फोट करणार असल्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली. तुम्हाला स्वतःला वाचवायचे असेल तर वाचवा अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर लगेच हेमंत पाटील यांनी १५ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना याबद्दल माहिती दिली. पुन्हा २० डिसेंबरला त्याच क्रमांकावरुन फोन आला. मात्र हेमंत पाटील यांनी तो फोन उचलला नाही. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन हेमंत पाटील यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहुन या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान, हेमंत पाटील यांना आधीच सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
हेही वाचा :