Sangli News : खानापूर उपकेंद्रासाठी शिवाजी विद्यापीठ अधिसभेत ठराव; वैभव पाटील यांच्या सुचनेला आ. पडळकरांचा पाठिंबा | पुढारी

Sangli News : खानापूर उपकेंद्रासाठी शिवाजी विद्यापीठ अधिसभेत ठराव; वैभव पाटील यांच्या सुचनेला आ. पडळकरांचा पाठिंबा

विटा: पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर या ठिकाणी व्हावे, अशी सूचना कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अधिसभेत मांडली. विशेष म्हणजे या सूचनेला भाजप आमदार आणि अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य गोपीचंद पडळकर यांनी तत्काळ पाठिंबा दिला आहे. Sangli News

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक आज (दि.२२) दुपारी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू सभागृहात पार पडली. यात एकूण ३७ विषयावर चर्चा झाली. यातच मूळ कार्य सूचीच्या विषय क्रमांक १७ मध्ये वैभव पाटील यांनी उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर या ठिकाणी व्हावे, या उपकेंद्रामुळे खानापूरसह आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस आणि कडेगाव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे, अशी शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेत केली.
या ठरावाला सूचक म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी तत्काळ पाठिंबा दिला. गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे विद्यापीठ उपकेंद्राच्या मागणीचा प्रश्न प्रलंबित आहे. Sangli News

दरम्यान, आज झालेल्या अधिसभेमध्ये वैभव पाटील यांनी मांडलेल्या या ठरावाला प्राध्यापक संघटना, विद्यापीठ विकास आघाडी, तसेच विकास मंच या सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. सिनेट सदस्य तसेच सांगली सुटा अध्यक्ष प्रा.डॉ. निवास वरेकर, संजय परमाणे यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली.

याबाबत वैभव पाटील म्हणाले की, आजच्या अधिसभेत आम्ही ठराव मांडला, हा ठराव विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाकडे जाईल आणि मंजुरी मिळेल. तूर्तास पहिला टप्पा पूर्ण झाला. या उपकेंद्रामुळे खानापूर तालुक्याला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत या उपकेंद्रामुळे खानापूरसह आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस आणि कडेगाव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे, अशी प्रतिक्रिया वैभव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

Back to top button