नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे विरोधक खवळले आहेत आणि निराशेने संसदेत व्यत्यय आणत आहेत, अशी बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली. तर संसद सुरक्षा भंग ही घटना चिंताजनक आहे. मात्र विरोधी पक्ष यातील आरोपींचे समर्थन करतो हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचेही ते म्हणाले. (PM Modi On Opposition's)
संसद भवन परिसरात मंगळवारी सकाळी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तसेच त्यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीदरम्यान विरोधक संसदेच्या अधिवेशनात करत असलेल्या निदर्शनांवरून त्यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव झाला. या पराभवामुळे ते अस्वस्थ आणि निराश झाले आहेत. त्याच निराशेने ते संसदेत व्यत्यय आणत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. (PM Modi On Opposition's)
या बैठकीला संबोधित करताना पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसदेतील विरोधकांच्या वर्तनामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची संख्या आणखी कमी होईल आणि भाजपला संख्याबळ मिळेल. विरोधी पक्षाचे लक्ष्य आहे की आम्हाला सत्तेबाहेर काढणे तर आमचे लक्ष्य देशातील लोकांचा विकास करणे असल्याचेही ते म्हणाले. विरोधी पक्ष हा कायम विरोधातच असणार आहे. आमच्या सरकारमध्ये ९ वर्षात कुठलाही भ्रष्ट्राचार झाला नाही. याचाही पुनरोच्चार त्यांनी केला. (PM Modi On Opposition's)
दरम्यान, संसद सुरक्षा भंग ही घटना चिंताजनक आहे. मात्र विरोधी पक्ष यातील आरोपींचे समर्थन करतो हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचेही ते म्हणाले. लोकशाही आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने या घटनेचा एकत्रितपणे निषेध करायला हवा होता, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा पक्ष उघडपणे किंवा गुप्तपणे त्याचे समर्थन कसे करू शकतो, असा सवाल देखील त्यांनी विचारला. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच संसदेत झालेल्या घुसखोरीबद्दल बेरोजगारी आणि महागाईला जबाबदार धरले होते. (PM Modi On Opposition's)
संसद सुरक्षा भंग प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाच्या मागणीसाठी दोन्ही सभागृहात गोंधळ घालणे आणि कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल विरोधी पक्षाच्या ७८ खासदारांना सोमवारी निलंबित करण्यात आले. आता याच अधिवेशनात निलंबित केलेल्या एकूण खासदारांची संख्या १४१ झाली आहे.