मालेगावातील कथित धर्मांतरण प्रकरण विधानसभेत, आ. राहुल ढिकलेंकडून औचित्याचा मुद्दा

मालेगावातील कथित धर्मांतरण प्रकरण विधानसभेत, आ. राहुल ढिकलेंकडून औचित्याचा मुद्दा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मालेगावातील एमएसजी महाविद्यालयात करिअर मार्गदर्शनाच्या एका कार्यक्रमात हिंदू धर्माबद्दल गैरसमज पसरविणारी वक्तव्ये करत धर्मांतरण घडविण्याच्या कथित प्रकाराबद्दल नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मंगळवारी (दि.१९) विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

मालेगावातील एमएसजी महाविद्यालयात ११ जून २०२३ रोजी हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादंग निर्माण झाला होता. यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आ. ढिकले यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, या कार्यक्रमात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाविषयी माहिती देताना हिंदू धर्माविषयी गैरसमज पसरतील, अशी वक्तव्ये करण्यात आली होती. दोन धर्मांमध्ये धार्मिक तेढ व धार्मिक तणाव होईल, असा संदेश या कार्यक्रमातून गेला. यावेळी काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमातील गैरप्रकार उघडकीस आणला गेला.

कार्यक्रमाला पुण्यातील डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटचे अनिस कुट्टी यांना कॉलेजमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आर्मी नेव्ही प्रशिक्षणासंदर्भात माहिती देण्याचे सोडून विशिष्ट धर्म स्विकारण्यासंदर्भात माहिती दिली. हिंदू धर्मात तेढ निर्माण होईल, असा हा कार्यक्रम होता. कुट्टी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. या घटनेसंदर्भात केंद्रीय बाल हक्क आयोगाने दखल घेतली आहे. बाल हक्क आयोगामार्फत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना नोटीसही देण्यात आली आहे. त्यानंतर देखील अनिस कुट्टी यांच्या संस्थेवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. २ जुलैला सकल हिंदू समाजाचा हिंदू जन आक्रोश मोर्चा मालेगावात काढण्यात आला. तरीसुद्धा कुट्टीवर अद्यापपर्यंत कुठली कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणाची व घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आ. ढिकले यांनी केली.

दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य कुट्टी यांच्याकडून करण्यात आले. हिंदू संघटनांनी सदर प्रकार उघडकीस आणला. या विरोधात मोर्चा निघाला व बाल हक्क आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस देखील बजावली. शासनाने दखल घेवून अशा कार्यक्रमांवर बंदी आणावी.

– ॲड. राहुल ढिकले, आमदार.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news