‘२०५० पर्यंत गोवा बनणार अग्रगण्य राज्य’ : गोवा मुक्ती दिन सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत यांचे प्रतिपादन | पुढारी

'२०५० पर्यंत गोवा बनणार अग्रगण्य राज्य' : गोवा मुक्ती दिन सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत यांचे प्रतिपादन

पणजी : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण भारत विकासाच्या दिशेने झेप घेत आहे. गोव्याची प्रगती झपाट्याने वाढत असून राज्याचे दरडोई उत्पन्न 30 टक्क्यांनी वाढले आहे. लोकांनी या सरकारला अशीच साथ दिली तर 2050 पर्यंत गोवा इतर राज्यांपेक्षा अग्रगण असेल. कार्बन प्रदूषण मुक्त राज्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी गोवा मुक्ती दिन सोहळ्यात केले.

गोवा मुक्तीदिनाचा 62 वा राज्य सोहळा ताळगाव येथे आयोजित करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, मुख्य सचिव परिमल राय, पोलिस महासंचालक डॉ. जसपाल सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले, राज्यातील कूळ-मुंडकारांना जमिनींचे अधिकार एका वर्षाच्या आत देण्याचा आपण संकल्प केला आहे. मामलेदार न्यायालयासमोर उत्तर गोव्यात तर दक्षिण गोव्यात दीड हजार खटले प्रलंबित आहेत. हे सर्व खटले वर्षभरात निकाली काढले जाणार आहेत. त्यासाठी सरकारने कूळ आणि मुंडकारांना जमिनींची मालकी देण्याची प्रक्रिया गतिमान केलेली आहे. सर्वप्रथम मुंडकारांचा प्रश्न हाती घेतला आहे. मुंडकार राहत असलेली घरे त्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. ते राहत असलेले घर व घरा सभोवतांची एकूण 300 चौरस मीटर जमीन त्यांना देण्यात येत आहे.

राज्याला पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकर्‍या देण्यात आल्या आहेत. काहींना देण्यात आलेली नोकरी सोडून त्यांनी चांगल्या हुद्याची पदे मागितली आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांना सरकारी नोकर्‍या देण्यात येतील, अशी हमी त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय शिक्षण धोरण सर्वांनी स्वीकारले असून या अंतर्गत 700 शाळांनी सुविधांसाठी अर्ज केल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य सरकारने स्वयंपूर्ण गोवा मोहीम राबवली. या योजनेंतर्गत तळागाळातील जनतेचा विकास साधण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. केंद्राच्या विश्वकर्मा योजनेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 20 हजारांपेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार अहोरात्र काम करीत आहे. सरकारच्या या प्रयत्नांना गोमंतकीय जनतेनेही पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते विविध क्षेत्रांत जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पर्वरी उड्डाण पुलाची 22 रोजी पायाभरणी

झुआरी पुलाची दुसरी लेन येत्या 22 डिसेंबरला नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. या पुलाच्या सर्व म्हणजे आठही लेन नाताळापूर्वी खुले करण्याचे आपण दक्षिणेतील लोकांना वचन दिले होते व आपण शब्द पाळला असल्याचे ते म्हणाले. या पुलावर फिरते रेस्टॉरंट उभे करण्याची संकल्पना केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. ती आता प्रत्यक्षात उतरणार असून 270 कोटी खर्चून या ठिकाणी स्टेट ऑफ आर्ट रेस्टॉरंट बांधले जाणार आहे. त्याची पायाभरणीही त्याच दिवशी होणार आहे. त्यासोबतच पर्वरी येथे 641 कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाची पायाभरणी त्याच दिवशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

Back to top button