Vasundhara Raje: राजस्थानात वसुंधरा ‘राज’ संपुष्टात, ‘भजनलाल शर्मा’ नवे मुख्यमंत्री | पुढारी

Vasundhara Raje: राजस्थानात वसुंधरा 'राज' संपुष्टात, 'भजनलाल शर्मा' नवे मुख्यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क: rajasthan cm वसुंधरा राजे या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचा लोकप्रिय चेहरा आहेत. परंतु राजस्थान मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांना पक्षाने बाहेरच ठेवत, भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानातील जयपूरमध्ये मंगळवारी (दि.१२) झालेल्या पक्षाच्या विधीमंडळ बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे राजस्थानातील वसुंधरा राज संपुष्टात आले आहे. (Vasundhara Raje)

पाचपैकी तीन राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर मोठा सस्पेन्स ठेवत भाजपने छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरील नावांची घोषणा केली. दरम्यान भाजपने पक्षातील प्रस्थापित दिग्गज नेत्यांना डावलले आणि तीनही राज्यात धक्कातंत्र वापरत मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे पुढे आणले आहेत. दरम्यान राजस्थानमध्ये देखील भाजपचा चेहरा मानल्या जाणाऱ्या वसुंधरा राजे यांना डावलत पक्षाने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान केले आहे. (Vasundhara Raje)

Vasundhara Raje: विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत

राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण २०० जागा आहेत, त्यापैकी १९९ जागांवर २५ नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्यानंतर ३ डिसेंबरला निकाल जाहीर झाला होता. या निवडणुकीत भाजपला ११५ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला ६९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. (Vasundhara Raje)

‘वसुंधरा’ राजस्थानच्या दोनवेळा मुख्यमंत्री

भाजपचा राजस्थानातील चेहरा असलेल्या वसुंधरा राजे या २ वेळा (two terms) मुख्यमंत्री राहिल्या आहेत. लोकसभेच्या 2003 ते 2008 आणि त्यानंतर पुन्हा 2013 ते 2018 या काळात त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाचा एकही उमेदवार जाहीर केला नाही. यावेळी पक्षाला राज्यात नवीन नेतृत्व हवे होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच वसुंधरा यांना तसा स्पष्ट संदेशही दिला होता. तसेच पक्षाने अनेक खासदारांना राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत उतरवले होते.

मुलाच्या कृत्यांचा वसुंधरांना फटका?

विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर वसुंधरा राजे यांचे निष्ठावंत आमदार त्यांच्या निवासस्थानी जाऊन शक्तिप्रदर्शन करत होते. दरम्यान राजे यांचा मुलगा दुष्यंत सिंह हा एका नव्या वादात सापडला होता. एका नवनिर्वाचित आमदाराच्या वडिलांनी आरोप केला होता की पक्षाच्या इतर चार आमदारांनी आपल्या मुलाला एका रिसॉर्टमध्ये कैद केले होते आणि हे सर्व दुष्यंत यांच्या सूचनेवरून करण्यात आले होते. तसेच यादरम्यान दुष्यंत राजे यांच्यावर आपल्या आईसाठी आमदारांसोबत लॉबिंग केल्याचा आरोप आहे. या राड्यानंतर वसुंधरा राजे आणि दुष्यंत यांनी नंतर भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांची भेट घेऊन घटनांबद्दल त्यांचे मत मांडले होते. दरम्यान वसुंधरा राजे यांनी त्या पक्ष हायकमांडच्या निर्णयासोबत असल्याचे म्हटले होते. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या विजयाचे श्रेय तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते.

निवडणुक निकालानंतर त्यांची ‘X’ पोस्ट चर्चेत

विधानसभा निवडणुकानंतर पक्ष श्रेष्टींची भेट घेतल्यानंतर वसुंधरा राजे यांची एक पोस्ट चर्चेत होती. त्यांनी ‘एक्स’ वर संसदेत खासदारांनी आयोजित केलेल्या पंतप्रधान मोदींच्या सत्कार कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, “राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रचंड विजय हे सूचित करतात की, पंतप्रधान मोदींच्या हमीसमोर काँग्रेसची खोटी आश्वासने आणि दावे पूर्ण झाले नाहीत. आज भाजप संसदीय दलाच्या बैठकीत खासदारांनी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा:

Back to top button