पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानमधील नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावरून कायम असलेला सस्पेंस आज संपुष्टात आला. विधानसभा निवडणुक निकालानंतर तब्बल १० दिवसांनी आज (दि.१२) पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ते पहिल्यांदाच सांगानेर मतदार संघातून निवडून आले आहेत. राजस्थानला मुख्यमंत्री म्हणून नवीन ब्राह्मण चेहरा मिळाला आहे. (Rajasthan New CM)
राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण २०० जागा आहेत, त्यापैकी १९९ जागांवर २५ नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्यानंतर ३ डिसेंबरला निकाल जाहीर झाला होता. या निवडणुकीत भाजपला ११५ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर तब्बल १० दिवस राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या बैठकांचे सत्र राबवले गेले. भाजपचे पर्यवेक्षक केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी जयपूरमध्ये दाखल झाले. यानंतर जयपूरमध्ये आज (दि.१२) झालेल्या बैठकीनंतर पक्षश्रेष्टींकडून राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली. (Rajasthan New CM)
छत्तीसगडमध्ये आदिवासी आणि मध्य प्रदेशमध्ये ओबीसी प्रवर्गातील मुख्यमंत्री झाल्यानंतर आता राजस्थानमध्ये ओपन प्रवर्गातील ब्राह्मण समाजातील मुख्यमंत्री होत आहे. राजस्थानात वसुंधरा राजे यांच्यासोबत बालकनाथ योगी, गजेंद्र सिंह शेखावत, दिया कुमारी, अश्विनी वैष्णव अशी दिग्गज नावे शर्यतीत होती. (Rajasthan New CM)
भजनलाल शर्मा हे भरतपूर येथील रहिवासी असून ते अनेक दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहेत. राजस्थान भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही सध्या कार्यरत आहेत. भाजपने त्यांना प्रथमच जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून निवडणूक लढवायला लावली आणि ते पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले. भाजपने सांगानेर मततदारसंघातून विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती. राजस्थानातील सांगानेर ही जागा भाजपचा बालेकिल्ला मानला जाते. या स्थितीत भजनलाल शर्मा विजयी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील भजनलाल यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.