Rajasthan New Dy. CM : छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही 2 उपमुख्यमंत्री; ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब | पुढारी

Rajasthan New Dy. CM : छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही 2 उपमुख्यमंत्री; ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानला नवा मुख्यमंत्री मिळाला असून मंगळवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. गेल्या नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांचा सस्पेंस आधीच संपवला आहे. दोन्ही राज्यांमध्ये हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे आणले आणि राजस्थानमध्येही तेच दिसून आले. मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव, तर छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साई यांच्याकडे त्या-त्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Rajasthan New Dy. CM)

दरम्यान, भाजपने छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवी हे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर वासुदेव देवनानी हे राजस्थानचे नवीन विधानसभा स्पीकर असणार आहेत. (Rajasthan New Dy. CM)

राजस्थानमध्येही १ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री फॉर्म्युला

राजस्थानात भाजपने  भजनलाल शर्मा या नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले आहे. तर दोन उपमुख्यमंत्र्याची देखील घोषणा केली आहे. याचप्रमाणे मध्यप्रदेशातही भाजपने एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला अंमलात आणला आहे. मध्यप्रदेशमध्ये आमदार ओबीसी प्रवर्गातील मोहन यादव यांची नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. जगदीश देवडा आणि राजेश शुक्ला यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले आहे. दरम्यान छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अरुण साव आणि विजय शर्मा यांना उपमुख्यमंत्री पद सोपवण्यात आले. माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना विधानसभा स्पीकर म्हणून निवडण्यात आले. (Rajasthan New Dy. CM)

हेही वाचा:

 

Back to top button