UPI payment | रुग्णालये, शैक्षणिक संस्थांसाठी यूपीआय पेमेंट मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली, आरबीआयची घोषणा | पुढारी

UPI payment | रुग्णालये, शैक्षणिक संस्थांसाठी यूपीआय पेमेंट मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली, आरबीआयची घोषणा

पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रुग्णालये, शैक्षणिक संस्थांना पेमेंट करण्यासाठी यूपीआय पेमेंट (UPI payment) मर्यादा प्रति व्यवहार १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी द्वि-मासिक पतविषयक धोरण समिती (MPC) बैठकीच्या निर्णयाची माहिती देताना यूपीआय पेमेंट मर्यादा वाढवल्याची घोषणा केली.

संबंधित बातम्या 

पतविषयक धोरण समिती (MPC) च्या निर्णयांची घोषणा करताना RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, “UPI व्यवहारांच्या विविध श्रेणींच्या मर्यादेचा वेळोवेळी आढावा घेण्यात आला आहे. आता रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना पेमेंट देण्यासाठी UPI व्यवहार मर्यादा प्रति व्यवहार १ लाखावरुन ५ लाख रुपये करण्यात आली आहे.”

UPI ची व्यवहार मर्यादा काही श्रेणी वगळून प्रति व्यवहार १ लाख रुपये इतकी मर्यादित होती. भांडवली बाजार (AMC, broking, mutual funds), कलेक्शन (क्रेडिट कार्ड पेमेंट, कर्जाची परतफेड, ईएमआय), विमा, आदीसाठी UPI पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादित होती. डिसेंबर २०२१ मध्ये रिटेल डायरेक्ट स्कीम आणि IPO सबस्क्रिप्शनसाठी UPI पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

RBI ने म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन्स, इन्शुरन्स प्रीमियम सबस्क्रिप्शन्स आणि क्रेडिट कार्डच्या रिपेमेंटसाठी रिकरिंग ऑनलाइन व्यवहारांसाठी ई-आदेशांची मर्यादा प्रति व्यवहार १५ हजार रुपयांवरून १ लाख रुपये करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. यामुळे ई-आदेशाच्या वापराला आणखी गती मिळेल, असे दास यांनी म्हटले आहे.

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारतातील रिअल-टाइम पेमेंट प्रणाली आहे जी स्मार्टफोन वापरून विविध बँकांमधील अखंड, झटपट व्यवहारांना अनुमती देते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे सुरू केलेल्या UPI ने विविध बँकिंग सेवांसाठी एक एकीकृत प्लॅटफॉर्म प्रदान करून डिजिटल व्यवहारांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे.

Back to top button