NCRB Report : देशात दर तासाला पडतो तिघांचा मुडदा ! २०२२ मध्ये २८,५२२ हत्यांची नोंद | पुढारी

NCRB Report : देशात दर तासाला पडतो तिघांचा मुडदा ! २०२२ मध्ये २८,५२२ हत्यांची नोंद

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सूड, किरकोळ भांडण, जुने वाद आणि हेव्यादाव्यांतून एकमेकांना कायमचे संपवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षी देशात अशाच वादांतून तब्बल २८ हजार ५२२ जणांना प्राण गमवावा लागला आहे. याचा अर्थ दिवसाला ७८ तर तासागणिक तीनपेक्षा अधिक जणांचा मुडदा देशात पाडला जातो. विशेष म्हणजे लाचखोरीप्रमाणेच इथेही महाराष्ट्र देशात ‘टॉप थ्री’मध्ये समाविष्ट आहे.

संबंधित बातम्या : 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये देशात २८ हजार ५२२ हत्या झाल्या. २०२१ मध्ये २९ हजार २७२ तर त्याआधी २०२० मध्ये २९ हजार १९३ जणांची हत्या झाली होती. २०२२ मध्ये ९,९६२ हत्या वादातून झाल्या. तर ३,७६१ प्रकरणात वैयक्तिक सूड आणि शत्रुत्व तर १,८८४ प्रकरणांत फायदा हे कारण होते.

२०२२ मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे हत्येचा दर २.१ टक्के होता, असे एनसीआरबी सांगते. यावर्षी सिक्कीम (९), नागालँड (२१), मिझोराम (३१), गोवा (४४) व मणिपूर (४७) या राज्यांत सर्वात कमी खून झाले. केंद्रशासित प्रदेशांपैकी दिल्लीत सर्वाधिक ५०९ खुनाचे गुन्हे दाखल झाले. दरम्यान, २०२२ मध्ये सर्वाधिक हत्या प्रौढांच्या (तब्बल ९५.४ टक्के) झाल्या. एकूण झालेल्या हत्यांमध्ये महिलांची संख्या ८,१२५ तर तृतीयपंथियांची संख्या ९ होती. या आकडेवारीनुसार हत्या झालेल्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ७० टक्के होते.

महाराष्ट्रात २२९५ खून

२०२२ मध्ये उत्तर प्रदेशात खुनाची सर्वाधिक ३,४९१ प्रकरणे नोंद झाली. याबाबतीत बिहार (२,९३०), महाराष्ट्र (२,२९५), मध्यप्रदेश (१,९७८), राजस्थान (१,८३४) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. देशातील हत्यांची आकडेवारी पाहता या पाच राज्यांचा त्यातील वाटा तब्बल ४३.९२ टक्के भरतो, असे एनसीआरबी सांगते. अर्थात, ही सर्व मोठी राज्ये असून, प्रत्येक लाखामागे खुनाच्या प्रमाणात उत्तर प्रदेश (१.५), बिहार (२.३), महाराष्ट्र (१.८), मध्य प्रदेश (२.३) व राजस्थान (२.३) असे प्रमाण राहिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button