Assembly Election Results 2023 | भाजपनं जिंकली लोकसभेची सेमीफायनल! आता १२ राज्यांत स्वबळावर सत्ता | पुढारी

Assembly Election Results 2023 | भाजपनं जिंकली लोकसभेची सेमीफायनल! आता १२ राज्यांत स्वबळावर सत्ता

पुढारी ऑनलाईन : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या चार राज्यांतील निवडणुकीत भाजपने ३ राज्यांत मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमधील काँग्रेसची सत्ता भाजपने हिसकावून घेतली आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. येथे कमलनाथ यांचा प्रभाव दिसून आलेला नाही. दरम्यान, तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्त्वाखालील बीआरएसला धक्का देत काँग्रेसने बाजी मारली आहे. (Assembly Election Results 2023)

राजस्थानमध्ये भाजपला ११५ जागा मिळणे जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दुपारी ३.३० पर्यंत भाजपने १८ जागा जिंकल्या असून ९७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रसचे ५ उमेदवार निवडून आले असून ६४ जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशात भाजपने १६० चा आकडा पार केला आहे. भाजपचे ४ उमेदवार विजयी घोषित करण्यात आले असून त्यांनी इतर १६२ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. येथे काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. काँग्रेसने ६२ जागांवर आघाडी घेतली आहे.

संबंधित बातम्या 

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मागे टाकून भाजपने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ९० जागा असलेल्या छत्तीसगड विधानसभेत भाजपने ५३ जागांवर निर्णायक आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. तर तेलंगणात केसीआरची जादू संपली आहे. येथे काँग्रेसला ६३ जागा मिळणे जवळपास स्पष्ट झाले आहे. येथे काँग्रेसचे ४ उमेदवार विजयी झाले असून इतर ५९ जागांवर आघाडीवर आहेत. तर बीआरएस ४० जागांपर्यंत खाली आले आहे. भाजपने येथे ९ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर एमआयएम ६ जागांवर आघाडीवर आहे. (Telangana Assembly Election Results 2023)

ब्रँड मोदींवर शिक्कामोर्तब

भाजपने स्थानिक नेतृत्त्व पुढे न करता पंतप्रधान मोदी यांचा चेहरा पुढे करत विधानसभा निवडणुका लढवल्या. हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्यांत भाजपला यश मिळाल्याने ब्रँड मोदींवर शिक्कामोर्तब झाले आहे.

भाजपची १२ राज्यांत स्वबळावर सत्ता?

४ पैकी ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट विजयाकडे वाटचाल करणाऱ्या भाजपने या राज्यांमध्ये सरकार स्थापन केले, तर भाजपची स्वबळावर सत्ता स्थापन होणाऱ्या राज्यांची संख्या १२ होईल. तर दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभूत झाल्यानंतर केवळ ३ राज्यांमध्ये त्यांची सत्ता राहिली. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सरकार असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

‘या’ राज्यांत भाजपची सत्ता

केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपची उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या राज्यांत स्वबळावर सत्ता आहे. याशिवाय भाजप महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे.

काँग्रेसची ३ राज्यांत सत्ता?

काँग्रेसची कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता आहे. आता तेलंगणामध्येही ते सत्ता स्थापन करतील. यामुळे त्यांची ३ राज्यांत सत्ता असणार आहे. (Assembly Election Results 2023)

हिंदी पट्ट्यात विजय, भाजपला लोकसभेला होणार फायदा

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील लोकसभेच्या जागांचा विचार केल्यास या ३ राज्यांत लोकसभेच्या एकूण ६५ जागा आहेत. यामुळे या तिन्ही राज्यांत भाजपचे सरकार स्थापन केल्याचा प्रभाव आगामी लोकसभा निवडणुकीवर पडून त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. १९९९ पासून सतत लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन हिंदी भाषिक राज्यांत भाजपचा दबदबा राहिला आहे.

Back to top button