Telangana Election Result 2023 | तेलंगणात काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण? रेवंत रेड्डींसह 'ही' नावे चर्चेत | पुढारी

Telangana Election Result 2023 | तेलंगणात काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण? रेवंत रेड्डींसह 'ही' नावे चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या ९ वर्षांपासून सत्तेत असलेल्या केसीआर सरकारला तेलंगणातील जनतेने धक्का दिला आहे. राज्यातील ११९ विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला (BRS) दुसर्‍या क्रमांकावर ढकलून काँग्रेस सत्तेच्या मार्गावर आहे. येथे काँग्रेसने ६४ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे, तर बीआरएस (BRS) ४० जागांवर थांबला आहे. त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे

तेलंगणात काॅंग्रेसने रेवंता रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणारा काँग्रेस हा तेलंगणात सत्तेवर येणारा दुसरा पक्ष ठरणार आहे. काँग्रेस विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच आता तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदाचा ‘मुकुट’ कोणाच्या डोक्यावर असणार, अशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे अनेक उमेदवार मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत, मात्र  तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (Telangana Election Result 2023)

संबंधित बातम्या : 

तेलंगणाची स्थापना २०१३ मध्ये झाली. त्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅट्ट्रिक करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान, तेलंगणाचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे.

तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हे या विजयी मोहिमेचा चेहरा आहेत. तेलंगणा काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मात्र अनेक चेहरे दावेदार आहेत. यामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्यासह खासदार कॅप्टन एन उत्तमकुमार रेड्डी, कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी आणि मल्लू भट्टी विक्रमार्क यांच्या नावांची चर्चा आहे. या सगळ्यात मात्र रेवंत रेड्डी यांच नाव आघाडीवर आहे.

कोण आहेत रेवंता रेड्डी?

अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर जिल्ह्यात १९६९ मध्ये जन्मलेल्या अनुमुला रेवंत रेड्डी यांनी विद्यार्थी संघटनेपासूनच राजकारणाला सुरुवात केली. उस्मानिया विद्यापीठातून पदवी घेतलेले रेड्डी त्यावेळी अभाविपशी संबंधित होते. नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. TDP उमेदवार म्हणून त्यांनी २००९ साली आंध्र प्रदेशच्या कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. २०१४ मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले. रेवंत यांनी २०१९ मध्‍ये मलकाजगिरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवून ते खासदार झाले. यानंतर तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने त्‍यांना प्रदेशाध्‍यक्षपदी नियुक्‍त केले. या निवडणुकीत ते काँग्रेसचे स्टार प्रचारक होते.

‘या’ नेत्यांची नावे चर्चेत (Telangana Election Result 2023)

एन उत्तमकुमार रेड्डी

काँग्रेसने २०१८ ची विधानसभा निवडणूक उत्तम रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. रेड्डी २०१५ ते २०२१ पर्यंत तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. अविभाजित आंध्र प्रदेशात काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून काम केले आहे. रेड्डी हे तीन वेळा विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. १९९९ मध्ये ते प्रथमच काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर कोडाड विधानसभा मतदारसंघातून यशस्वी झाले आणि विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.

२००४ च्या विधानसभा निवडणुकीतही कोडाड मतदारसंघातून निवडणूक जिंकून दुसऱ्यांदा विधानसभेत गेले होते. २००९ मध्ये हुजूरनगर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्यात ते यशस्वी झाले. यावेळी ते तेलंगणातील हुजूरनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.

कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी

याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकली तर सोनिया गांधी त्यांना मुख्यमंत्रीपद देतील,’ असा दावा केला होता.

मोहम्मद अझरुद्दीन

माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अझरुद्दीन यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे, मात्र रेवंता रेड्डी यांचे नाव पहिल्या स्थानासाठी चर्चेत आहे.

हेही वाचा : 

Back to top button