बंगळूर: पुढारी वृत्तसेवा: अलीकडेच बेकायदेशीर खाण आणि वाळू माफियांवर कारवाई करणाऱ्या ४५ वर्षीय ज्येष्ठ सरकारी भूवैज्ञानिक महिला अधिकाऱ्याची हत्येची घटना रविवारी(दि.५) सकाळी घडली. दक्षिण बेंगळुरूमधील खाण आणि भूविज्ञान विभागाच्या उपसंचालिका प्रतिमा (वय ४५) यांचा अज्ञातांनी गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्या राहत्या घरीच अज्ञातांकडून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. सुबह्मण्यमपूरमधील दोडुकल्ल येथील गोकुळ अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये प्रतिमा या एकट्याच राहत होत्या. त्या एकट्याच असल्याचे पाहून त्यांच्या परिचयातील अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने गळा कापून खून केल्याचा अंदाज आहे. (Woman Officer Murder)
बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात खाण आणि भूविज्ञान विभागात त्या कार्यरत होत्या. त्यांचे पती आणि मुलगा तीर्थहळ्ळी येथे राहत होते. रात्री ८ वाजता वाहनचालकाने त्यांना कार्यालयातून घरी सोडले. त्यानंतर खून झाल्याचा अंदाज आहे. रात्री त्यांच्या मोठ्या भावाने फोन केला. फोन स्वीकारला नसल्याने ते घरी आले. त्यावेळी खुनाची घटना उघडकीस आली. प्रतिमा यांचा १८ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांची खाण आणि भूविज्ञान खात्यात निवड झाली. त्यानंतर त्या बंगळूर येथे आठ वर्षांपासून भाड्याने राहत होत्या. त्यांना १५ वर्षांचा मुलगा असून तो दहावीत शिकत आहे. (Woman Officer Murder)
अलीकडेच बेकायदेशीर खाण आणि वाळू माफियांवर कारवाई केली होती. त्यामुळे बेकायदेशीर खाण, वाळू माफिया आणि संबंधितांवर संशयितांची टांगती तलवार आहे. दरम्यान बेकायदेशीर खाणकाम तसेच संशयित कौटुंबिक वादाच्या विरोधात तिच्या कारवाईच्या अहवालांसह अनेक बाजूंनी तपास करत आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Woman Officer Murder)