Rajasthan Assembly Election : काँग्रेसमध्ये बंडाळी; भाजपात अस्वस्थता | पुढारी

Rajasthan Assembly Election : काँग्रेसमध्ये बंडाळी; भाजपात अस्वस्थता

दीपक टांटिया

काँग्रेस आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता वीस दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याचा चंग बांधलेल्या उभय पक्षांनी बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अर्थातच, यामुळे प्रत्येक मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे.

तिकीट वाटपानंतर काँग्रेसमध्ये बंडाळी माजली आहे. दुसरीकडे भाजपमध्ये अस्वस्थता असली, तरी ती उघडपणे समोर आलेली नाही. काँग्रेसचे नेते व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध सरदारपुरा मतदारसंघात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना भाजप मैदानात उतरविणार असल्याची जोरदार चर्चा होती. तथापि, पक्षाने याठिकाणी डॉ. महेंद्र राठोड यांना उमेदवारी दिली आहे. जोधपूर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष असलेले राठोड हे गेहलोत यांच्यासमोर फारसे मजबूत उमेदवार नाहीत. राठोड हे राजपूत समाजाचे प्रतिनिधित्व करतात. पहिल्यांदाच ते सरकारपुरामधून निवडणूक लढवित आहेत. याआधीच्या दोन निवडणुकांचा विचार केला, तर भाजपने शंभूसिंह खेतासर यांना तिकीट दिले होतेे; पण दोन्हीवेळी त्यांना गेहलोत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
राजस्थानच्या राजकारणातील धुरंधर नेते म्हणून गेहलोत आणि शेखावत ओळखले जातात. दोघेही जोधपूरचे आहेत. अशा स्थितीत या दोघांचा मुकाबला झाला असता, तर सरदारपुरामधली निवडणूक रंजक झाली असती. विशेष म्हणजे शेखावत यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी गेहलोत यांचे पुत्र वैभव यांचा पराभव केला होता. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून शेखावत यांच्याकडे पाहिले जात असले, तरी भाजपकडून याबाबत स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत. तिकीट वितरणामध्ये आपल्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात तिकीट देण्यात शेखावत यशस्वी ठरले आहेत.

भाजपचे दुसरे दिग्गज नेते किरोडीलाल मीना यांना मात्र आपल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यात अपयश आले आहे. स्वत: किरोडीलाल यांना सवाई माधवपूर मतदारसंघात तिकीट मिळाले असले, तरी इतरत्र त्यांच्या समर्थकांना फारशी संधी देण्यात आलेली नाही. 2018 च्या निवडणुकीवेळी दौसा, करौली, सवाई माधवपूर आणि अलवर भागांत मीना समर्थकांना तिकीटे देण्यात आली होती. मात्र, वरील भागांत भाजपचा सुपडासाफ झाला होता. या पार्श्वभूमीवर मीना यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे मानले जात आहे.

तिकीट वाटपानंतर उसळलेली बंडाळी ही काँग्रेसच्या चिंतेचे प्रमुख कारण आहे. ‘प्रत्येकाला खूश करणे शक्य नाही. ज्यांना तिकीट मिळालेले नाही, त्यांना अन्यत्र संधी दिली जाईल’, असे आश्वासन मुख्यमंत्री गेहलोत यांनी नेत्यांना, कार्यकर्त्यांना दिले असले तरी त्याचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. ज्या प्रमुख नेत्यांकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले आहे, त्यात शांतीलाल धारिवाल, महेश जोशी आणि धर्मेंद्र राठोड यांचा समावेश आहे. धारिवाल हे गहलोत यांचे निकटवर्तीय मानले जातात; पण तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तिकडे महेश जोशी यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे जोशी यांच्यासमोरही आव्हानांचा डोंगर आहे. बंडाळी भडकली तर काँग्रेसला बहुमताचा 101 चा आकडा गाठणे कठीण जाऊ शकते, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. गेहलोत आणि सचिन पायलट गटांदरम्यान सध्या शांतता असली तरी उद्रेक कधी उफाळून येईल, याची शाश्वती नाही. भाजपने यावेळची निवडणूक गांभीर्याने घेतली असल्याने काँग्रेससमोरचे आव्हान वाढले आहे.

बंडखोरांनी धरला ‘आरएलपी’ चा रस्ता…

हनुमान बेनिवाल यांची राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि चंद्रशेखर आझाद यांची आझाद समाज पार्टी या निवडणुकीत एकत्र आली असून, ही आघाडी सर्वच्या सर्व 200 मतदारसंघांत उमेदवार उतरविणार आहे. काँग्रेस आणि भाजपच्या बंडखोर नेत्यांना ही आघाडी आकर्षित करीत आहे. काँग्रेस – भाजपमधील बंडखोरांना तिकीट देणार असल्याची घोषणा बेनिवाल यांनी केली होती. बरेच बंडखोर नव्या आघाडीत सामील झालेले देखील आहेत. या पार्श्वभूमीवर बंडखोरांनी आपली सगळी ताकत पणास लावली, तर प्रस्थापित पक्षांची डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही.

निवडणुकीच्या तोंडावर छापेमारी

ऐन निवडणुकीच्या तोंडावर तपास संस्थांची काँग्रेस नेत्यांच्या ठिकाणांवरील छापेमारी ही चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद डोटासरा तसेच मुख्यमंत्री गेहलोत यांचे पुत्र वैभव यांच्याविरोधात कारवाई सुरू असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. पेपर फुटीच्या प्रकरणात डोटासरा तर विदेश चलन नियमांचा भंग केल्याप्रकरणी वैभव यांच्यावर कारवाई सुरू आहे. डोटासरा यांच्या दोन्ही मुलांना ‘ईडी’ने 7 आणि 8 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ‘ईडी’च्या रडारवर राजस्थानमधील इतर नेतेही असल्याची चर्चा आहे.

Back to top button