Naresh Karda Case Nashik : नरेश कारडा विरोधात अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल | पुढारी

Naresh Karda Case Nashik : नरेश कारडा विरोधात अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे. पोलिसांनी कारडा समूहाच्या कार्यालयातून हार्डडिस्क व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच कारडा यांच्या रखडलेल्या प्रकल्पांचा तपास सुरू केला आहे. कारडा यांच्याविरोधात उपनगर पोलिसांत चार कोटी रुपयांचा अपहाराचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Naresh Karda Case Nashik)

नाशिकमधील व्यावसायिक राहुल जयप्रकाश लुणावत (४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नरेश कारडा, मनोहर कारडा, देवेश कारडा व संदीप शहा यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने नरेश कारडा यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोनदा पोलिस कोठडी सुनावली आहे. रविवारी (दि. ५) कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी कारडा यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. पोलिसांनी कारडा यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोहर कारडा यांनी आत्महत्या केली. कारडा यांच्या विरोधात पोलिसांकडे सत्तर गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी करून कारडा यांच्या रखडलेल्या बांधकाम प्रकल्पांचा तपास सुरू केला आहे. कार्यालयातून ‘हार्डडिस्क’ जप्त करण्यात आली आहे. तर अपहार केल्याप्रकरणी कारडांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात रविवारी (दि. ५) दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Naresh Karda Case Nashik)

कर्ज घेतले, मात्र ताबा मिळेना

गुंतवणूकदारांनी कर्ज घेऊन कारडा समूहाच्या २३ प्रकल्पांमध्ये सदनिका, शॉप खरेदी केले. मात्र, बहुतांश प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण झालेले नसल्याने गुंतवणूकदारांना ताबा मिळालेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना एकीकडे कर्जाचे हप्ते भरावे लागत असून, मालमत्तेचा ताबा मिळत नसल्याने ते दुहेरी संकटात सापडला आहे. कित्येकांच्या कर्जाचे निव्वळ व्याज वाढत आर्थिक बोजाही वाढला आहे.

हेही वाचा :

Back to top button