Triple Talaq Case | आयब्रोज केल्याने महिलेला पतीने फोनवरच दिला तिहेरी तलाक, काय आहे प्रकरण? | पुढारी

Triple Talaq Case | आयब्रोज केल्याने महिलेला पतीने फोनवरच दिला तिहेरी तलाक, काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका महिलेला आयब्रोज (eyebrows shaped) केल्याच्या क्षुल्लक कारणावरुन तिच्या सौदी अरेबियातील पतीने फोनवर तिहेरी तलाक दिला आहे. या प्रकरणी सदर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आयब्रोज केल्याचे कारण देत तिच्या पतीने तिला सौदी अरेबियातून फोनवरुन तिहेरी तलाक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Triple Talaq Case)

संबंधित बातम्या

गुलसायबा असे त्या महिलेचे नाव आहे. तिने जानेवारी २०२२ मध्ये सलीम या व्यक्तीशी लग्न केले होते. सलीम सौदी अरेबियात नोकरीला आहे. गुलसबाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ३० ऑगस्ट २०२३ रोजी तिचा नवरा सौदी अरेबियाला निघून गेल्यानंतर सासरच्यांनी तिचा हुंड्यासाठी छळ करण्यास सुरुवात केली. तिने पुढे पोलिसांना सांगितले की तिचा नवरा जुन्या विचारांचा आहे आणि त्याला तिने केलेली फॅशन आवडत नाही.

गुलसायबाचे म्हणणे आहे की, ४ ऑक्टोबर रोजी तिच्या पतीने तिला व्हिडिओ कॉल केला. यावेळी त्याला तिच्या नुकत्याच कोरलेल्या आयब्रोज दिसल्या. त्याने तिला याबद्दल जाब विचारला. तिने त्यावर सांगितले की तिचा चेहरा आयब्रोजवरील अनावश्यक केसांमुळे चांगला दिसत नाही, यामुळे आयब्रोज कोरल्या. ही गोष्ट त्याला आवडली नाही. यामुळे तो चिडला.

गुलसायबाच्या म्हणण्यानुसार, सलीमने तिला धमकी दिली आणि तो म्हणाला, “मला आवडत नाही तरी तू आयब्रोज का केल्यास? आजपासून मी तुला या वैवाहिक नात्यातून मुक्त करतो,” आणि त्याने व्हिडिओ कॉलवर तीन वेळा तलाकचा उच्चार केला. त्यानंतर त्याने कॉल डिस्कनेक्ट केला. त्याच्याशी कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याला प्रतिसाद दिला नाही, असे गुलसायबाने सांगितले.

गुलसायबाच्या तक्रारीची दखल घेत तिच्या पती, सासूसह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले आहे. “माझ्या लग्नाला फक्त एक वर्ष झाले होते. पती आधी माझा अनादर करायचा आणि आता त्याने मला तिहेरी तलाक दिला आहे. पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी माझी इच्छा आहे.” असे गुलसायबाने म्हटले आहे. (Triple Talaq Case)

हे ही वाचा :

Back to top button