भिवंडीत प्रेयसीसमोर पत्नीला मोबाईलवरून दिला तिहेरी तलाक | पुढारी

भिवंडीत प्रेयसीसमोर पत्नीला मोबाईलवरून दिला तिहेरी तलाक

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा : मुस्लिम महिलांना दिलासा मिळावा याकरीता तिहेरी तलाकवर बंदी आणून मोदी सरकाराने विधेयक आणुन संसदेत कायदा पारित केला आहे. तर दुसरीकडे कायदा पारित होऊनही चक्क मोबाईलमध्ये चित्रीकरण करून तलाक, तलाक, तलाक बोलून प्रेयसी व पत्नीच्या कुटूंबासमोरच पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तलाक देणाऱ्या पतीसह त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज अन्सारी (३२) आणि त्याची प्रेयसी समीना मोमीन असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर नसरीन बानो एजाज अन्सारी (३०) असे पीडित पत्नीचे नाव आहे.

पीडित नसरीन बानो आणि आरोपी एजाज यांचा ९ एप्रिल २०१० रोजी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. निकाह केल्यानंतर दोघे पती-पत्नी म्हणून भिवंडीतील नवी वस्ती भागात राहत असताना त्यांना तीन मुलेही झाली. त्यातच २०१८ मध्ये पीडित पत्नीच्या नणंदचा साखरपुडा असताना आरोपी पतीचे त्याच भागात राहणाऱ्या समीनाशी ओळख होऊन कालातंराने दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर पीडित पत्नीला पतीचे सुरु असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने तिने विरोध केला होता. मात्र त्यावेळी उलट पतीच तिला मारहाण करत शिवीगाळ करून गप्प राहण्यास सांगत असे, त्यानंतर मात्र आरोपी पती पत्नीशी माफी मागून जुळून घेत होता. त्यातच २०२० मध्ये पीडित पत्नी आणि तिचा पती एजाज हे दोघे माहेरी आई- वडीलांच्या घरी भेटणे करीता गेले असता त्यावेळी पीडित पत्नीने तिच्या आईवडीलांना एजाज याचे प्रेमसंबंधाबाबत सांगितले असता, आई वडिलांनी मला पती एजाज यांस सोडुन देण्याचा सल्ला दिला होता. मात्र या गोष्टीचा आरोपी पतीस राग येवुन त्याने पत्नीला तिच्या आईवडीलांसमोर • मारहाण केली व घरी घेवुन आला. त्यानंतर सुध्दा एजाज याचे त्याची प्रेयसी समीना हिचे मोबाईलवर बोलणे तसेच तिला भेटणे सुरूच होते. २६ फ्रेब्रुवारी २०२३ रोजी रात्री १० वाजल्याच्या सुमारास आरोपी पती त्याची प्रेयसी आणि पीडित पत्नीचे कुटूंब एकत्र येत यातून मार्ग काढून आरोपी पतीला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्या दिवशीच पीडित पत्नीच्या कुटूंबासह प्रेयसी समोरच पत्नीला तेहरी तलाक दिला. त्यावेळी मैं एजाज अशफाक अन्सारी, नसरीन, मोबीन अन्सारी की लड़की को तलाक देता हूँ, तलाक, तलाक, तलाक, असे तीन वेळा उच्चारून मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण करून तलाक दिला.

दरम्यान, पीडित पत्नीचा मानसिक आणि शारीरीक छळ केल्याने २ मार्च २०२३ रोजी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भांबरे करीत आहेत.

Back to top button