Salman Khurshid : हिंदुत्वाची तुलना ‘इसिस’शी, सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून वाद | पुढारी

Salman Khurshid : हिंदुत्वाची तुलना ‘इसिस’शी, सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून वाद

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला (UP election) अजून काही महिने बाकी असून काँग्रेस (congress) येथे आपली स्थिती मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. दरम्यान, माजी कायदामंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या एका पुस्तकावरून खळबळ उडाली आहे. या पुस्तकामुळे राजकीय वातावरणही तापले आहे.

अयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात खुर्शीद यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात अयोध्या निकालाचे समर्थन करताना या मुद्द्यावरून पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे, तर दुसरीकडे त्यांनी हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांशी केली आहे. बुधवारी (दि. १०) संध्याकाळी उशिरा हे पुस्तक प्रकशित करण्यात आले. मात्र प्रकाशनानंतर अवघ्या २४ तासांत खुर्शीद यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांशी केल्याने हा वाद वाढला आहे.

विवेक गर्ग नावाच्या वकिलाने दिल्ली पोलिस आयुक्तांकडे ही तक्रार केली असून गुन्हा नोंदवण्याचे आवाहन केले आहे. खुर्शीद यांच्यावर हिंदुत्वाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सलमान खुर्शीद यांनी आपल्या नव्या पुस्तकात ‘हिंदुत्वाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो, निवडणूक प्रचारादरम्यान त्याचा अधिक उल्लेख केला जातो’ असे म्हटले आहे. पुस्तकात त्यांनी म्हटले आहे की, ‘सनातन धर्म किंवा शास्त्रीय हिंदू धर्मापासून दूर राहून हिंदुत्वाचा प्रचार केला जात आहे. इसिस आणि बोको हराम सारख्या दहशतवादी संघटनांशी हिंदुत्वाची तुलना करताना खुर्शीद म्हणतात की, हिंदुत्व सनातन आणि संतांचा प्राचीन हिंदू धर्म बाजूला ठेवत आहे, जो प्रत्येक प्रकारे इसिस आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखा आहे, असं तक्रारदाराचे म्हणणे आहे.

भाजपकडून जोरदार टीका…

सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या पुस्तकाबाबत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली जाते. हीच आजची काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून हे वारंवार घडते. त्याचवेळी भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, ‘सलमान खुर्शीद यांनी वाद निर्माण करण्यासाठीच हे पुस्तक प्रकाशित केले असावे. ते तुष्टीकरणाच्या राजकारणाचे समर्थन करतात. काँग्रेस नेते आणि गांधी परिवार तुकडे-तुकडे गँगचे समर्थक आहेत. त्यांना जातीच्या आधारावर देशाचे विभाजन करायचे आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

Back to top button