समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होतेय. त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
काल गुजरातच्या द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडले आहे. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर तीन टन ड्रग्ज सापडले होते. त्याची किंमत २७ हजार कोटी रुपये होती. या ड्रग्जच्या खेळात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी, सुनिल पाटील हे किरीटसिंग राणा यांच्याकडे वारंवार का जात आहेत? हे सगळे गुजरातच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कशासाठी रहात आहेत? अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.
मुंद्रा एअरपोर्टवरील ड्रग्ज प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले आहे. आता द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडल्यानंतर एनसीबीची जबाबदारी आहे यातून सत्य बाहेर काढावे. या देशातून अमली पदार्थाचा व्यापार नेस्तनाबूत करण्यासाठी १९८५ मध्ये कायदा करण्यात आला होता. त्याची अमलबजावणी करावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
मुंबईत दोन – चार ग्रॅम ड्रग्ज पकडून बॉलिवूडला बदनाम करुन प्रसिद्धी करण्यात येत आहे. समुद्रमार्गे ड्रग्ज येत आहे. तेपण गुजरातमध्ये रॅकेट सुरू आहे. हे सगळं मनिष भानुशाली, धवल भानुशाली व त्यांचे इतर सहकारी गुजरातमधून सांभाळत आहेत. त्यामुळे या तपासाचा छडा एनसीबी व एनआयए यांनी लावावा मग यामध्ये कोण कितीही मोठा असो, मंत्री असो किंवा कार्यकर्ता आहे न पहाता ड्रग्जच्या खेळात जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाईअंती शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा एनसीबी आणि एनआयए यांच्याकडून नवाब मलिक यांनी केली आहे.