आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये (Fuel Price) सातत्याने चढ-उतार बघायला मिळत आहे.असे असले तरी,गेल्या सात दिवसांपासून देशातील इंधानाचे दर स्थिर असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. बुधवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात तेल विपणन कंपन्यांकडून कुठलाही बदल करण्यात आला नाही. कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८४ डॉलर प्रती बॅरल पर्यंत पोहचले आहेत.कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली असली,तरी देशातील इंधनाचे दर ३ नोव्हेंबर पासून स्थिर आहे.
देशाची राजधानी दिल्लीत बुधवारी पेट्रोलचे दर लीटरमागे १०३.९७ रूपये आणि डिझेलचे दर ८६.६७ रूपये नोंदवण्यात आले. तर, आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत १०९.९८ रूपये आणि डिझेलची किंमत ९४.१४ रूपये होते. चेन्नईत पेट्रोल १०१.४० रूपये आणि डिझेल ९१.४३ रूपये दराने विकले गेले. कोलकातात डिझेल ८९.७९ रूपये आणि पेट्रोल १०४.६७ रूपयांपर्यंत पोहचले आहे. (Fuel Price)
केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्यात आल्यानंतर आसाम, त्रिपुरा, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि कर्नाटक सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यासोबत हरियाणामध्येही व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. या सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.पंजाब सरकारने देखील पेट्रोलची किंमत १० रूपये आणि डिझेलची किंमत ५ रूपयांनी कमी करीत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने मात्र अद्याप इंधनांवरील करात कपात केली नाही.