नोकरदारांसाठी गूड न्यूज, इन हँड सॅलरीत वाढ होणार, जाणून घ्या एचआरए नियमांतील बदल | पुढारी

नोकरदारांसाठी गूड न्यूज, इन हँड सॅलरीत वाढ होणार, जाणून घ्या एचआरए नियमांतील बदल

सतीश जाधव

नोकरदार वर्गासाठी प्राप्तिकर खात्याकडून एक गूड न्यूज आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) रेंट फ्री होमशी संबंधित नियमांतील बदलांसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर कर्मचार्‍यांच्या ‘टेक होम सॅलरी’ म्हणजे इन हँड सॅलरीत वाढ होईल.

देशात नोकरी करणार्‍या मंडळींसाठी नवीन नियम आला आहे. तो लागू झाल्यानंतर वेतनदार मंडळींची इनहँड सॅलरी वाढेल. अर्थात, सध्याच्या महागाईचा सामना करणार्‍या नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्राप्तिकर विभागाने कंपनीकडून कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या ‘रेंट फ्री अ‍ॅकोमोडेशन’च्या नियमांत बदल केला आहे. सीबीडीटीने अधिसूचना काढली आहे. परिणामी, कर्मचार्‍यांच्या हाती जादा वेतन पडणार असून ते आणखी बचत करू शकतील. रेंट फ्री अ‍ॅकोमोडेशनशी नियमांतील बदल हे 1 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.

घरांच्या मूल्यांकनात होणार बदल

सीबीडीटीनुसार, केंद्र किंवा राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांव्यतिरिक्त अन्य कर्मचारी कंपनीच्या मालकीच्या असलेल्या घरात राहत असतील, त्या घराच्या मूल्यांकनात आता बदल केला आहे. या नियमानुसार ज्या कर्मचार्‍यांना कंपनीकडून घर दिले जाते, अशा घराची मालकी कंपनीकडे आहे, त्याचे मूल्यांकन आता वेगळ्या मार्गाने होईल. शहरी क्षेत्र आणि त्याची लोकसंख्या ही 2011 जनगणनेनुसार 40 लाखांपेक्षा अधिक असेल, तेथे एचआरए हा वेतनाच्या 10 टक्के असेल.

यापूर्वी 2001 च्या जनगणनेनुसार 25 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील नोकरदारांचा एचआरए हा वेतनाच्या 15 टक्के एवढा होता.
तज्ज्ञांच्या मते, एकीकडे कर्मचार्‍यांचे वेतन वाढेल आणि बचतही वाढेल; पण सरकारी महसुलात घट होईल.

Back to top button