Assembly Elections 2023 : ६७९ मतदार संघ, १६.१ कोटी मतदार, जाणून घ्या ५ राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम | पुढारी

Assembly Elections 2023 : ६७९ मतदार संघ, १६.१ कोटी मतदार, जाणून घ्या ५ राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. नक्षलवादाचा उपद्रव असलेल्या छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होईल. तर उर्वरित चारही राज्यांमध्ये एका टप्प्यात निवडणूक होईल. मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर, मध्यप्रदेशात १७ नोव्हेंबर, राजस्थानात २३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबरला निवडणूक होईल. ३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. (AssemblyElections2023)

संबंधित बातम्या :

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, अनुपचंद्र पांडेय आणि अरुण गोयल यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेसोबत राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू होती. त्यासाठी मागील चाळीस दिवसात निवडणूक आयोगाने पाच राज्यांमध्ये दौरा केल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये सरळ लढत रंगणार आहे. मध्यप्रदेशात भाजपची सत्ता आहे तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष सत्तेत असून काँग्रेस आणि भाजपनेही आक्रमक तयारी केली असल्याने या राज्यात तिरंगी लढत होईल. ईशान्य भारतातील मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंट विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष असेल. मिझो नॅशनल फ्रंट हा भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.

६७९ मतदार संघ, १६.१ कोटी मतदार

पाच राज्यांमध्ये मध्यप्रदेशातील २३०, छत्तीसगडमधील ९०, राजस्थानातील २००, तेलंगानामधील ११९ आणि मिझोरममधील ४० अशा ६७९ विधानसभा मतदार संघांसाठी १६.१ कोटी मतदार मतदान करतील. त्यात पुरुष मतदार ८ कोटी तर, ७ कोटी महिला मतदार आहेत. या निवडणुकांमध्ये ६० लाख तरुण मतदार पहिल्यांदा मतदान करतील. या मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी पाच राज्यांमध्ये १.७७ लाख मतदान केंद्र असतील. सर्व मतदान केंद्रांमध्ये पेयजल, दिव्यांगासाठी मदत, यासारख्या मुलभूत सुविधा असतील. यंदा महिला मतदारांची संख्या वाढल्याची पुस्ती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जोडली. नवे मतदार नोंदणीसाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत मोहिम राबविली जाणार असल्याची घोषणाही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. तसेच जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणूक कधी होणार यावर, सुरक्षा आणि अन्य गोष्टींची दखल घेऊन योग्यवेळी निर्णय करण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले.

अशी होईल निवडणूक (AssemblyElections2023)

छत्तीसगड (९० जागा) – ७ नोव्हेंबर २०२३ (पहिला टप्पा), १७ नोव्हेंबर २०२३ (दुसरा टप्पा)
मिझोरम विधानसभा (४० जागा) – ७ नोव्हेंबर २०२३
मध्यप्रदेश विधानसभा (२३०) – १७ नोवेंबर २०२३
राजस्थान विधानसभा (२०० जागा) – २३ नोव्हेंबर २०२३
तेलंगाना (११० जागा) – ३० नोव्हेंबर २०२३
मतमोजणी आणि निकाल – ३ डिसेंबर २०२३

हेही वाचा : 

Back to top button