ED Raids: दिल्ली मद्य धोरण घोटाळा; आप खासदाराच्या निवासस्थानावर ईडीचा छापा | पुढारी

ED Raids: दिल्ली मद्य धोरण घोटाळा; आप खासदाराच्या निवासस्थानावर ईडीचा छापा

पुढारी ऑनलाईन डेस्क: नवी दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आणखी एक आप खासदार अडचणीत आले आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्या निवासस्थानावर आज (दि.०४) ईडीचे छापे टाकले. मद्य धोरण घोटाळा प्रकरच्या आरोपपत्रात खासदार संजय सिंग यांचे देखील नाव होते. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. (ED Raids)

ED Raids: संजय सिंग होणार होते तैवानला रवाना

आप खासदार संजय सिंग काल रात्री महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तैवानला जाणार होते. पण सरकारने त्यांना बाहेर जाण्यास परवानगी दिली नाही, त्यामुळे ते तैवान येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत.

संजय सिंग यांच्यावर आरोपपत्रात काय आहेत आरोप?

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या आरोपपत्रात मद्य घोटाळ्यातील आरोपी व्यापारी दिनेश अरोरा याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या बैठकीला संजय सिंग देखील उपस्थित होते, असा आरोप ईडीने केला आहे. संशयित आरोपी दिनेश अरोरा यांने ईडीसमोर दिलेल्या जबाबानुसार, संजय सिंग यांची पहिल्यांदा एका कार्यक्रमात भेट झाली. यानंतर ते मनीष सिसोदिया यांच्या संपर्कात आले.

संजय सिंह यांच्या सांगण्यावरून, मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी दिनेश अरोरा यांनी दिल्लीतील आगामी निवडणुकांसाठी पक्ष निधी गोळा करण्यासाठी अनेक रेस्टॉरंट मालकांशी चर्चा केली. एवढेच नाही तर ३२ लाखांचा धनादेशही त्यांनी सिसोदिया यांच्याकडे सुपूर्द केला. उत्पादन शुल्क विभागाकडे प्रलंबित असलेले दिनेश अरोरा यांचे एक प्रकरण संजय सिंग यांनी सोडवल्याचा आरोपही ईडीने आरोपपत्रात केला आहे.

हेही वाचा:

Back to top button