Nashik News : हात बांधलेले, तोंडात कापसाचा बोळा; पाण्यावर तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह | पुढारी

Nashik News : हात बांधलेले, तोंडात कापसाचा बोळा; पाण्यावर तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह

सिन्नर पुढारी वृत्तसेवा : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे बायपास लगत मंगळवारी (दि. ३) एका बंधाऱ्यात हात बांधलेला व तोंडात कापसाचा बोळा कोंबलेल्या अवस्थेत पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. तथापि, मृतदेह गौरव संपत नाईकवाडे (रा. लामखेडे मळा, तारवालानगर, पंचवटी, नाशिक) याचा असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. बायपास लगत दोन ते तीन दिवसांपासून बेवारस स्थितीत उभी दुचाकीही आढळून आली आहे. (Nashik News)

संबधित बातम्या :

नांदूरशिंगोटे येथील बायपास रस्त्यालगतचा बंधारा तुडुंब भरलेला असून, बंधाऱ्यालगत राहत असलेले शेतकरी उत्तम शेळके यांना पाण्यावर डोके बाहेर असलेला मृतदेह तरंगताना आढळला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. पाण्यावर तरंगणाऱ्या व हात बांधलेल्या स्थितीत त्यांना मृतदेह मिळून आला. लोखंडे यांनी ही घटना वरिष्ठांना कळविली. त्यानंतर नाशिक येथून फॉरेन्सिक तज्ज्ञांना बोलवण्यात आले. पथक आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बंधाऱ्यातून बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, या प्रकारात घातपाताचा , संशय असल्याने पोलिसांनी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलिस या प्रकरणी कसून तपास करीत आहेत.

मृत तरुण नाशिकचा रहिवासी

दरम्यान, सोमवारी (दि. २) सकाळपासून घटनास्थळाच्या जवळच नाशिक-पुणे महामार्गावर बेवारस स्थितीत पांढरी अॅक्टिव्हा (क्र. एमएच १५, एफएच ५४३७) उभी होती. याबाबतही स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. सदरच्या गाडीची चौकशी केली असता ती दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक येथील असल्याचे समजले. गाडी मालकाकडे चौकशी केली असता मृत तरुणाची ओळख पटली. गौरव नाईकवाडे हा गाडी घेऊन रविवारपासून बेपत्ता असल्याचे समजले.

हेही वाचा :

Back to top button