World Heart Day 2023 : ‘हार्ट अटॅक’ टाळण्यासाठी काय करावे?, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात | पुढारी

World Heart Day 2023 : 'हार्ट अटॅक' टाळण्यासाठी काय करावे?, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

डॉ. महादेव दीक्षित

वृद्ध व्यक्तीलाच हृदयविकाराचा धोका असतो हा गैरसमज आता दूर करण्याची गरज आहे. सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोकांच्या व्यस्त जीवनशैलीचा परिणाम त्यांच्या आहार आणि जीवनशैलीवर पडताना दिसत आहे. परिणामी हृदयविकारही वाढत चालला आहे. यामुळे केवळ वृद्धच नाही तर तरुणही हृदय विकाराला बळी पडत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, हृदयाशी संबंधित आजारांबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी ‘जागतिक हृदय दिन’ (World Heart Day 2023) साजरा केला जातो.

संबंधित बातम्या : 

नुकतेच आपण हृदयविकारामुळे काही सेलिब्रेटींचा मृत्यू झाल्याचे पहिले. त्यामुळे वृद्ध व्यक्तीलाच हार्टअटॅक येतो हा गैरसमज आता दूर करायला हवा. कोणत्याही वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. विशेषतः लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यासारखे हृदयविकाराचे काही जोखीम घटक आहेत जे तरुणांमध्ये झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. वाईट जीवनशैलीच्या सवयी हृदयविकाराच्या जवळ घेऊन जाण्यासाठी मोठा हातभार लावत आहे. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि धूम्रपान या तीनच घटकांवर हृदयविकार अवलंबून असतात. त्यामुळे या घटकांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. (World Heart Day 2023)

तरुणांच्या हृदयाची स्थिती

आजकाल लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रोलची पातळी तरुणांमध्ये अधिक आहे. कारण अन्नाच्या सवयी आरोग्यास हानिकारक आहेत. बहुतेक तरुण फक्त जंकफूड आणि जास्त तेलात बनवलेल्या वस्तू खाणे पसंत करतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. परिणामी आहारातील बदल हेही तरुणांमध्ये हृदयविकार वाढण्याचे मुख्य कारण आहे. यामुळे तरुण पिढीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हृदयरोग टाळण्यासाठी आपली जीवनशैली बदलण्याची आवश्यकता आहे.

फिल्मी दुनियेवर हृदयविकाराचा विळखा

फिल्मी दुनिया म्हणजे प्रत्येकासाठी आकर्षणाचा व मनोरंजनाचा केंद्रबिंदू होय. अनेक सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांना निराश न करता त्यांचे मनोरंजन करत असतात. पण आता याच फिल्मी दुनियेवर हृदयविकाराचा विळखा बसत असल्याचे दिसून येत आहे. देशातील अनेक सुप्रसिद्ध सेलिब्रिटींचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे आपल्याला पहावयास मिळते. कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार, अभिनेते सतीश कौशिक, सिद्धार्थ शुक्ला, प्रदीप पटवर्धन, नितेश पांडे, इंदर कुमार, कॉमेडियन राजू श्रीवास्तव, गायक कृष्णकुमार कुन्नत (केके) आदी सेलिब्रिटींचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सेलिब्रिटी म्हटले की त्यांचा फिटनेस, आहारातील काटेकोरपणा, व्यायाम आलाच. तसेच ते आपले दैनंदिन जीवन एकदम नियोजपूर्वक जगत असतात. पण एवढी काळजी घेऊनसुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींचा मृत्यू झाल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे सामान्य नागरिकांनी विशेषतः तरुण पिढीने हृदयाबाबत अत्यंत जागृत राहणे गरजेचे आहे.

जागतिक हृदय संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिनाला मान्यता मिळाली. जागतिक हृदय संघटनेचे माजी अध्यक्ष अंतोनियो लूना यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली. त्यानुसार सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा ‘जागतिक हृदय दिन’ (World Heart Day 2023) म्हणून ठरविण्यात आला. त्यानुसार २४ सप्टेंबर २००० रोजी प्रथमच जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. सन २०११ पासून २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून घोषित करण्यात आला.

आपण अनेक वेळा असे बघतो की, एखादा चांगला चालता-बोलता व्यक्ती अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळतो. याचे कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जमलेली रक्ताची गुठळी (ब्लॉक). भारतात हृदयविकाराचे प्रमाण खूपच वाढले आहे. शिवाय मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत व प्रत्येक रुग्णाला हृदयविकार असल्याचे गृहीत धरतोच. विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वी चाळीशीच्या खालील एखादा रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात भरती व्हायचा. पण आता मात्र शंभरातील १० रुग्ण हमखास चाळीशीच्या खालील आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा व उच्च कोलेस्ट्रॉलची मात्रा या बाबींचा समावेश होतो.

हृदयरोग टाळण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. हृदयरोग टाळण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ, चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे बंद करायला हवे. त्याचबरोबर दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. जागतिक आरोग्य संघटनेने २०१३ मध्ये नॉन कम्यूनिकेबल डिसीज नियंत्रणात आणण्यासाठी ही मोहीम सुरू केली. कार्डियो व्हॅस्क्युलर डिसीज (सीव्हीडी) यातील महत्त्वाचा भाग आहे. २०२५ पर्यंत सीव्हीडीमुळे वाढणारा मृत्यूदर २५ टक्क्यांनी कमी विशेष म्हणजे तरुण पिढीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हृदयरोग टाळण्यासाठी हृदयाची काळजी गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हृदयरोग टाळण्यासाठी काय करावे…

– किमान ३० मिनिटे व्यायाम करावा
– सकस आहार आवश्यक
– दररोज पुरेशी झोप घेणे
– तणाव घेऊ नये
– वजन नियंत्रित ठेवणे
– मधुमेह रक्तदान नियंत्रित ठेवणे

काय करू नये…

– धूम्रपान टाळावे
– मद्यसेवन टाळावे
– तंबाखूचे सेवन टाळावे
– चरबीयुक्त पदार्थ कमी करावे

हेही वाचा : 

Back to top button