मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण त्यातही एसटी-एलिव्हेशन मायो-कार्डियल इंफार्क्शन (स्टेमी) या प्रकारच्या हृदयविकाराने अकाली मृत्यू ओढवण्याचे प्रमाण अधिक आहे. ते रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेला 'स्टेमी महाराष्ट्र' उपक्रम अशा रुग्णांना जीवदान देणारा ठरतो आहे. या उपक्रमात पहिल्याच वर्षात अडीच लाख 'ईसीजी' घेण्यात आले. त्यात 2 हजारांवर रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात आले.
भारतात हृदयविकाराचे झटके हे मृत्यू आणि अपंगत्वाची प्रमुख कारणे आहेत. वर्षाला 1.5 ते 3 दशलक्ष मृत्यू यामुळे होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, यातील 35 टक्के मृत्यू हे अगदी तरुण वयात होत आहेत. अलीकडील अहवालानुसार, राज्यात 30 ते 40 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदयविकाराचे आजार वाढले आहेत आणि त्यातही महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण 40 ते 60 वर्षे वयोगटामध्ये अधिक आहे. एस्केमिक हृदयविकारामुळे झटक्यांचे प्रमाण वाढते. त्यातील एक सर्वात प्रमुख धोका असतो तो एसटी-एलिव्हेशन मायो-कार्डियल इंफार्क्शन (स्टेमी) या आजाराचा. त्यातून होणारे मृत्यू रोखण्यासाठी 'स्टेमी महाराष्ट्र' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 'स्टेमी महाराष्ट्र' उपक्रमात बंगळूरच्या ट्रायकॉग हेल्थ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवले आहे. शिवाय, या योजनेला 'नॅशनल हेल्थ मिशन' (एएनएचएम)ची मान्यता आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुरुवातीची 90 मिनिटे म्हणजे दीड तासाचा वेळ महत्त्वाचा असतो. या वेळेत उपचार मिळाले, तर रुग्ण वाचू शकतो. हा वेळ तसा भरपूर असला, तरी भारतातील आरोग्य यंत्रणेची गती या वेळेतही रुग्णापर्यंत दीड तासात पोहोचण्याइतपत नाही. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णापर्यंत उपचार पोहोचण्यास आरोग्य यंत्रणेला सरासरी 360 मिनिटे लागतात. या जीवघेण्या संथगतीवर इलाज म्हणून महाराष्ट्र सरकारने 'स्टेमी महाराष्ट्र' ही योजना गतवर्षी म्हणजे 2021 च्या एप्रिल महिन्यात सुरू केली.
महाराष्ट्रातील सर्व सरकारी केंद्रांमध्ये हृदयविकाराचे निदान झपाट्याने व्हावे आणि त्यावर योग्य वेळेत उपचार व्हावेत या हेतूने 'स्टेमी महाराष्ट्र' प्रकल्पासाठी अकोला, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा आणि ठाणे या बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आली.
1) छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत धडधडणे आदी लक्षणे दिसू लागताच कोणताही विलंब न लावता जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रामध्ये धाव घेतली की, 'स्टेमी महाराष्ट्र'ची आरोग्य यंत्रणा तिथे हजर असते.
2) क्लाऊडशी कनेक्टेड 12 लेड 'ईसीजी'च्या माध्यमातून तत्काळ निदान होऊन काही मिनिटांत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला मिळतो आणि उपचार सुरू होतात. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत सर्व सरकारी यंत्रणा समाविष्ट असल्यामुळे रुग्णाला तत्काळ हलवणे आणि उपचार शक्य होतात.
3) 'स्टेमी मॅनेजमेंट, 'स्टेमी प्रोटोकॉल यांची एक यंत्रणा राज्य संनियंत्रण समितीच्या माध्यमातून सक्रिय असून, या समितीवर आघाडीचे हृदयरोगतज्ज्ञ, प्रशासक आणि तज्ज्ञ यांचा समावेश आहे.
4) 'स्टेमी महाराष्ट्र' उपक्रमात थ्रोम्बोलायसिस, एन्जिओप्लास्टी आणि बायपासदेखील केली जाते. हे उपचार करताना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचाही लाभ रुग्णांना मिळू शकतो.