

डेटिंग साइटवर (Dating Site) एका तरुणीशी तरुणाची ओळख झाली. डेटिंग साइटवरील भेटीनंतर लगेच चार दिवसांनंतर दोघांच्या शारिरीक संबंध प्रस्थापित झाले. लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने हे कृत्य केले. त्यानंतर त्या तरुणीला संबंधित तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. तरुणी चारित्र्यहीन असल्याचे त्याने म्हटले. या प्रकरणी तरुणावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. तसेच हे प्रकरण हायकोर्टात गेले. तेथे हायकोर्टाने तरुणाला फटकारत त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. या प्रकरणावर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हायकोर्टाने टिप्पणी करताना म्हटले की डेटिंग वेबसाइटवर अॅक्टिव्ह होण्याच्या आधारावर एखाद्या व्यक्तीच्या नैतिकतेचे मुल्यमापन करु शकत नाही. बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलाच्या युक्तीवादावर हायकोर्टाने ही टिप्पणी केली.
कोर्टातील युक्तिवादावेळी सांगण्यात आले की पीडित तरुणी डेटिंग साइटच्या (Dating Site) माध्यमातून संशयित आरोपीच्या संपर्कात आली. डेटिंग साइटवरील ओळखीनंतर चौथ्या दिवशीच ती त्याला भेटायला गेली. यामुळे पीडित तरुणीची चारित्र्य संशयास्पद आहे. पण कोर्टाने बचाव पक्षाचा हा दावा फेटाळून लावत संशयित आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. पीडितेने संशयित आरोपीवर लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप करत एफआयआर नोंदवले. पोलिसांत नोंद झालेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी आणि पीडित तरुणी डेटिंग साइटच्या माध्यमातून संपर्कात आले. ओळखीच्या चौथ्या दिवशीच दोघांची प्रत्यक्षात भेट झाली. यावेळी तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला.
गुन्हा नोंद झाल्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी नोएडा येथील रहिवासी असलेल्या अभय चोपडा या तरुणाने हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. संशयित आरोपीच्या वकिलाने युक्तिवादावेळी दोघे संपर्कात आल्याच्या चार दिवसांतच दोघांच्यात शारिरीक संबंध प्रस्थापित झाल्याचे सांगितले. दोघांमध्ये एकमेकांच्या सहमतीने संबंध प्रस्थापित झाल्याचा दावा त्यांनी केला. तरुणाने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले नव्हते. यामुळे बलात्काराचा आरोप करणे चुकीचे आहे, असाही दावा संशयिताच्या वकिलाकडून करण्यात आला. पण हायकोर्टाने संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
दोन प्रौढ व्यक्ती एखाद्या डेटिंग साइटच्या माध्यमातून संपर्कात आले असतील आणि चौथ्या दिवशी प्रत्यक्ष भेटीवेळी त्यांच्यात विश्वास निर्माण होऊन शारिरीक संबंध प्रस्थापित होत असतील तर यामुळे कोणाच्याही चारित्र्याचे मुल्यमापन अथवा नैतिकता निश्चित करता येत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.