दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आयडल कपल सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Akkineni Naga Chaitanya) यांनी हल्लीच घटस्फोटाची घोषणा केली होती. वैयक्तिक जीवनात सामंथाला घटस्फोटाला सामोरे जावे लागले. पण व्यावसायिक जीवनातून तिला गुड न्यूज मिळाली आहे. तिला अनेक नवीन चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. सामंथाचा 'शाकुंथलम' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
एका वृत्तानुसार, सामंथा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या प्रोडक्शन अंतर्गत बनणाऱ्या चित्रपटात सामंथाशी संपर्क केला जात आहे. तापसी पन्नू स्त्री प्रधान चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यासाठी कास्टिंग टीमकडून सामंथा रुथ प्रभूला मुख्य भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली आहे. दरम्यान, या वृत्ताला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पण सामंथा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार असल्याचे समजते.
सध्या सामंथा सुट्टीचा आनंद घेत आहे. तिचा 'शाकुंथलम' आणि विग्नेश शिवनचा 'काथुवाकुला रेंदु काधल' रिलीजच्या वाटेवर आहे.
सामंथा (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. काही दिवसांपूर्वीच ती चारधामा यात्रा करुन परतली आहे. याआधी ती महाऋषि महेश योगी यांच्या आश्रमात गेली होती. घटस्फोटानंतर ती नव्या जीवनाला सुरुवात करण्याचा तिचा प्रयत्न आहे.
सामंथा आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. या दोघांची 'ये माया चेसावे' चित्रपटात पहिल्यांदा भेट झाली होती. दोघांना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात आयडल कपल म्हणून मानले जात होते. परंतु, त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाले आणि अखेर त्यांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली.