भारतीय क्रिकेट संघाकडून सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकामध्ये निराशाजनक २ पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीसह संघातील अनेकांवर टीका होत आहे. दरम्यान, कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर नेतृत्व सोडण्याचे या आधीच जाहीर केले आहे. परंतु, वर्ल्डकपमधील खराब कामगिरीमुळे त्याचे वन-डे मधीलही कर्णधारपद धोक्यात आले आहे. आता कर्णधार पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये रोहित शर्माच्या नावाची चर्चा सुरू आहे. (Rohit Sharma)
येणार्या काही दिवसांत बीसीसीआय नेतृत्व आणि राष्ट्रीय निवड समितीच्या होणार्या बैठकीत एकदिवसीय कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या भविष्यावर देखील चर्चा होईल. यावेळी त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील काढून घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विराट कोहली याने कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केल्यानंतर रोहित शर्मा त्याची जागा घेणार असे बोलले जात आहे; पण पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप पाहता आता टी-20 बरोबरच वन-डे संघाचा कर्णधारही बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा काही दिवसांत राष्ट्रीय निवड समितीसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. यामध्ये संघाच्या नेतृत्वाबाबत विचार केला जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पुढील वर्षी खेळविण्यात येणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी जवळपास 11 महिने शिल्लक आहेत.
सध्याच्या सत्रात भारताला केवळ तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. बीसीसीआय 2023 मध्ये विश्वचषक स्पर्धेपूर्वी योजना तयार करण्याच्या विचारात आहे; पण एकदिवसीय कर्णधाराची घोषणा करण्याची घाई त्यांना नाही. जून 2022 पर्यंत भारताला 17 टी- 20 आंतरराष्ट्रीय आणि केवळ 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेसोबत एकदिवसीय मालिका खेळायची आहे आणि त्यामुळे कोहली स्वत: कर्णधारपद सोडतो का हे पहावे लागेल. निवृत्तीकडे चाललेल्या खेळाडूंना बीसीसीआय बाहेरचा रस्ता दाखवून त्यांच्या जागी तरुण रक्ताला वाव देण्याचा विचार करीत आहे.
फिटनेस आणि खराब फॉर्मचा सामना करीत असलेल्या हार्दिक पंड्या व भुवनेश्वर कुमार यांची संघातून हकालपट्टी निश्चित समजली जात आहे. या खेळाडूंच्या जागी आयपीएलमध्ये सर्वात अधिक धावा करणारा ऋतुराज गायकवाड आणि सर्वात जास्त विकेटस् घेणारा आवेश खानशिवाय युजवेंद्र चहलला संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला आराम दिला जाऊ शकतो.
पंड्याला पर्याय म्हणून वेंकटेश अय्यरला संघात स्थान दिले जाऊ शकते. ऑस्ट्रेलियन खेळपट्टीकडे पाहता जम्मू-काश्मीरचा युवा जलदगती गोलंदाज उमरान मलिकबाबतदेखील चर्चा होऊ शकते. अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, दीपक चहर टी-20 मालिकेत पुनरागमन करू शकतात. तर, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, उमेश यादव कसोटीसाठी संघात येऊ शकतात.