पुढारी ऑनलाईन डेस्क : ३ लाख ८४ हजार कि.मी.चे अंतर कापून चंद्रापर्यंत पोहोचलेल्या 'चांद्रयान-३'ने बुधवारी इतिहास रचला. चंद्रावर तिरंगा फडकला. चांद्रयानाच्या 'विक्रम' लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाय टेकवले आणि अवघा देश आनंदाने बेभान झाला. 'इस्रो'च्या मुख्यालयात श्वास रोखून धरलेल्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी आनंदाने एकच जल्लोष केला. याचदरम्यान एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले. 'चांद्रयान-३ चंद्रावर उतरताच ट्विटरवर २०१९ मधील तो भावनिक क्षण ट्रेंडवर आला. (Chandrayaan-3 Lands On Moon)
भारताच्या इस्रोने अखेर महापराक्रम केला. चांद्रयान ३ मोहिमेत विक्रम लँडर बुधवारी ठीक ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि अवघ्या देशाने एकच जल्लोष केला. 'चांद्रयान २' च्या मोहिमेत झालेल्या चुकांचा धडा घेत भारताने अंतराळ क्षेत्रात आपली अमीट मुद्रा उमटवली. इस्रोच्या या कामगिरीचे जगभर कौतुक होत आहे. संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचवावी अशी ही कामगिरी आहे. २०१९ मध्ये चांद्रयान २ मोहिम अपयशी ठरल्यानंतर इस्रोचे तत्कालिन अध्यक्ष के सिवन यांना अश्रू अनावर झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता. आज 'चांद्रयान ३' च्या यशाचा जल्लोष करत असताना चार वर्षांपूर्वीच्या सिवन यांच्या अश्रूंचे स्मरण झाले. त्यावेळेचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे माजी प्रमुख के. शिवन यांना मिठी मारली आणि त्यांना थाप दिल्याच्या दृश्याची आठवण पुन्हा एकदा देशाला झाली. भावनिक शिवन यांचे फोटो आणि त्यावेळचा व्हिडिओ एक्सवर प्रचंड व्हायरल झाले. काही व्हायरल फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे सांत्वन करतानाही दिसत होते. 'अपयश ही केवळ यशाची पायरी आहे,' असा संदेश फोटोंद्वारे दिला गेला. (Chandrayaan-3 Lands On Moon)
भारताच्या मागील चंद्र मोहिमेचा संदर्भ देत अभिनंदन संदेशात पंतप्रधान मोदी यांनी "या क्षणांनी माझं जीवन धन्य झालं आहे. हे यश आणि हे क्षण अविश्विसनीय आहे. आपल्या पराभवातून शिकून यश कसे मिळवायचे याचा हा दिवस एक उदाहरण आहे," अशा भावना व्यक्त केल्या.
या दैदीप्यमान ऐतिहासिक कामगिरीने भारत आता ब्रम्हांडाचा वेध घेण्यासाठी सज्ज झाला आहे. विक्रमाच्या दृष्टीने भारतासाठी वाट मोकळी असली, तरीही सॉफ्ट लँडिंगचे आव्हान हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. 'इस्रो' ने ते यशस्वीपणे पेलले. भारताच्या हजारो शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाचे चीज झाले.
हेही वाचा :