

स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट 2003) लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून आपल्या भावगर्भ भाषणातून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 2008 च्या आधीच भारताने चंद्रावर आपले यान पाठवलेले असेल, अशी घोषणा केली होती. नंतर 2008 मध्ये भारताच्या चांद्रमोहिमांना सुरुवात झाली. या वर्षी 22 ऑक्टोबर रोजी चांद्रयान-1 प्रक्षेपित झाले. यशस्वीपणे ही मोहीम पार पडली. अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत मजबूत व्हावा, अंतराळातही भारताचे अस्तित्व एक महाशक्ती म्हणून निर्माण व्हावे, त्या अनुषंगाने या क्षेत्रातील व्यावसायिक दालने भारतासाठी खुली व्हावीत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात इस्रोला मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला. यातूनच पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र दामोदरदास मोदी, आजवरच्या सर्व पंतप्रधानांच्या तुलनेत मोदींच्या काळात भारत सर्वाधिक 47 अंतराळ मोहिमा राबवू शकला.
चांद्रयान-2 मोहिमेत अखेरच्या क्षणी (सॉफ्ट लँडिंग करताना) लँडरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये बिघाड झाला होता आणि या मोहिमेला केवळ मर्यादित यश प्राप्त होऊ शकले होते. म्हणजेच प्रॉपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत स्थिरावले होते, पण लँडरचे सॉफ्ट लँडिंग अयशस्वी ठरले होते. लँडरशी संपर्क तुटला त्या क्षणाला तत्कालीन इस्रो प्रमुख सिवन यांना रडू कोसळले होते… इस्रोच्या मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हा त्यांना धीर दिला होता… संपर्क टुटा हैं, संकल्प नहीं, असे उद्गार तेव्हा पंतप्रधान मोदींनी काढले होते. इस्रोने हा धीर धरून ठेवला. मोदींनी पुढेही निधी कमी पडू दिला नाही. उलट हात जास्त मोकळा केला. चांद्रयान-2 मोहिमेत सॉफ्ट लँडिंग का होऊ शकले नाही, त्यामागच्या सर्व तांत्रिक कारणांची मिमांसा इस्रोने केली.
तेव्हा ब्रेकिंग सिस्टिममध्ये बिघाड झाला होता म्हणून लँडिंग झाले नव्हते. यावेळी त्यावर काम तर झालेलेच होते, या उपर अगदी सेन्सर निकामी झाले तरी विक्रम लँडर सुरक्षितपणे चंद्रावर उतरेल, अशी योजना इस्रोने केलेली होती. दुसरीकडे रशियाने ऐनवेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी लुना-25 लाँच केले. अंतराळ मोहिमांतील प्रदीर्घ अनुभव रॉसकॉसमॉस या रशियन अंतराळ संशोधन संस्थेच्या गाठीला होता. भारताच्या चांद्रयान-3 च्या आधी लुना 25 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल व येथे उतरण्याचा विश्वविक्रम रशियाच्या नावावर नोंदविला जाईल, अशा बेताने या मोहिमेची आखणी होती. अतिआत्मविश्वास त्यामागे होता. दुसरीकडे चांद्रयान-3 मोहिमेच्या आखणीत इस्रोने अपयशाधारित द़ृष्टिकोनाची निवड केली होती. चांद्रयान-2 च्या अपयशाचे तपशीलवार अध्ययन करून अपयशाची पुसटशीही शक्यता निर्माण करू शकतील, अशा प्रत्येक घटकावर काम केलेले होते. अगदी अल्गोरिदम काम करत राहिले तरी लँडर उतरेल, अशी चांद्रयान-3 ची रचना होती. इस्रोचे अध्यक्ष सोमनाथच नव्हे, तर इस्रोचे माजी अध्यक्ष सिवनही या मोहिमेच्या यशाबद्दल निश्चिंत होते. अवघ्या देशाला मात्र धाकधूक होती. लँडरने चंद्राचे चुंबन घेतले तेव्हा ती देशभरात झालेल्या आतषबाजीच्या धडाडधूममध्ये बदलून गेली…
१९६० : भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखल्या जाणार्या डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली 1962 मध्ये राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना करण्यात आली. जी पुढे इस्रो झाली. त्याच वर्षी केरळात थुुम्बा रॉकेट लाँचिंग स्टेशनचे काम सुरू झाले. तेथे डॉ. साराभाई यांच्यासह त्यांच्यासोबतच्या वैज्ञानिकांनी अक्षरशः कष्ट उपसले. सायकलवरून, बैलगाड्यांतून रॉकेटच्या सुट्या भागांची ने-आण केली. त्या श्रमांतून उभी राहिलेली इस्रो आज जगभरात एक नावाजलेली आणि दबदबा असलेली संस्था बनली आहे. चांद्रयानाच्या यशाचे कौतुक करताना डॉ. साराभाई यांचे स्मरण क्रमप्राप्त.
१९६२ : मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना झाली. याच वर्षी तिरुवनंतपूरमलगत थुम्बा रॉकेट लाँचिंग स्टेशनचे कामही सुरू झाले. (हे आता सतीश धवन अंतराळ स्थानक म्हणून ओळखले जाते)
१९६८ : पुढे 7 वर्षांनी इंदिरा गांधींच्या काळात इस्रो असे या समितीचे नामकरण करण्यात आले. इस्रोकडे पुरेसे मनुष्यबळ नव्हते. मर्यादित साधनसामग्रीसह सरकारकडून पुरविल्या जाणार्या निधीचा अभाव होता. या सगळ्या समस्या पंतप्रधान मोदींनी दूर केल्या. रॉकेट सायन्समधील भारताच्या भरारीत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे योगदानही मोलाचे ठरले. अंतराळदुर्गम ठिकाणी उमटला भारताचा ठसा नेहरूंनंतरच्या सरकारांचा तौलनिक आढावा घेतला असता मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक 47 अंतराळ मोहिमा इस्रोने राबविल्या. नरसिंहराव सरकारच्या काळात 5, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 6, मनमोहन सिंग सरकारच्या काळात 24 मोहिमा राबविण्यात आल्या होत्या. अर्थात तत्पूर्वीही आर्यभट्ट, भास्कर अशा मोहिमा भारताने पार पाडल्या. इंदिरा गांधींच्या काळात रशियासोबतच्या संयुक्त मोहिमेत अंतराळात राकेश शर्मा या पहिल्या भारतीयाचे पाऊल पडले… चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा विचार अवघ्या जगातील अंतराळ संशोधन संस्था करीत असताना मोदींच्या काळात अंतराळातील या अतिदुर्गम ठिकाणावर भारताचा तिरंगा फडकला!
चांद्रयान-1
22 ऑक्टोबर 2008 : सतीश धवन स्पेस स्टेशनवरून चांद्रयान 1 प्रक्षेपित झाले.
8 नोव्हेंबर 2008 : चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले व स्थिरावले.
14 नोव्हेंबर 2008 : स्पेसक्राफ्टच्या मदतीने एक मुन इम्पॅक्ट प्रोब चंद्रावर कोसळेल, अशा बेताने लँड केले.
29 ऑगस्ट 2009 : यानाने वर्षभरात चंद्राभोवती 3400 प्रदक्षिणा घातल्या आणि नमूद तारखेस यानाशी कायमचा संपर्क तुटला.
सप्टेंबर 2009 : यातून उपलब्ध झालेल्या डेटाच्या आधारे 'नासा'ने चंद्रावर पाणी असल्याचा निष्कर्ष काढला.
चांद्रयान-2
22 जुलै 2019 : चांद्रयान 2 लाँच झाले.
20 ऑगस्ट 2019 : चंद्राच्या कक्षेत पोहोचले.
6 सप्टेंबर 2019 : विक्रम लँडरची सॉफ्टलँडिंग सुरू झाली, पण संपर्क तुटला. अर्थात ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत फिरत राहिला व डेटा
संकलन करत राहिला. चंद्रावर उतरताना विक्रमचा वेग सेकंदाला 1683 मीटरवरून सेकंदाला 146 मीटर करण्यात आला, तेव्हा यादरम्यान ब्रेकिंग सिस्टीममध्ये बिघाड झाला. लँडिंग अयशस्वी ठरले.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याची आणि तेथे रोव्हर चालवण्याची क्षमता भारतात आहे, हे सिद्ध झाले! अंतराळ क्षेत्रातील जगाचा भारतावरील विश्वास वाढला. ज्यामुळे व्यावसायिक व्यवसाय वाढण्यास मदत होईल. भारताने स्वनिर्मित लाँच व्हेईकल एलव्हीएम-3, एम-4 च्या माध्यमातून चांद्रयान प्रक्षेपित करून जगाला थक्क केले आहे.
पृथ्वीवर कुठलीही, काहीही माहिती आजवर उपलब्ध झालेली नाही, अशा चंद्राच्या भागावर लँडर उतरलेले आहे.
चंद्रावरील पाणी हे लँडर शोधेलच, त्यासह सोने, प्लॅटिनियम, युरेनियम अशी खनिज संपत्ती आपल्या या उपग्रहावर आहे काय, त्याचाही शोध घेईल.
चंद्रावर लँडिंग धोकादायक होते. कारण…
मंगळ हा चंद्रापेक्षा पृथ्वीपासून कितीतरी लांब आहे, याउपर तेथे लँडिंग सोपे आहे. कारण मंगळावर वातावरण आहे. चंद्रावर लँडिंग कठिण यासाठी, की येथे वातावरण नाही. वातावरण नसल्याने चंद्रावर उतरण्यासाठी प्रॉपेलंटचा (प्रणोदक) वापर केला जातो. ते मर्यादित प्रमाणातच नेता येते.
पृथ्वीवर जीपीएसच्या मदतीने लोकेशनची माहिती मिळते. चंद्रावर लोकेशन दाखविणारे सॅटेलाईट नाही. त्यामुळे लोकेशनही कळत नाही आणि पृष्ठभागापासूनचे अंतरही कळत नाही. चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. इथे सूर्य फक्त क्षितिजालगत असतो. त्यामुळे मोठाल्या सावल्या पडतात. काहीही नीट दिसत नाही.