Manipur Violence : मणिपुरात दोन जमावांचा परस्परांवर गोळीबार; १७ जखमी | पुढारी

Manipur Violence : मणिपुरात दोन जमावांचा परस्परांवर गोळीबार; १७ जखमी

इम्फाळ; वृत्तसंस्था : दोन दिवस हिंसाचारांच्या घटना कमी झाल्या, असे वाटत असतानाच गुरुवारी पुन्हा मणिपुरात (Manipur Violence) हिंसाचाराचा भडका उडाला. बिष्णुपूर आणि चुराचांदपूरच्या सीमेवर कुकी आणि मैतेई यांच्या दोन गटांत जोरदार गोळीबाराच्या फैरी झाडण्यात आल्या; तर बिष्णुपूर जिल्ह्यात आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमकी झाल्या. त्यात सुरक्षा दलांनी हवेत गोळीबार केला तसेच जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या चकमकीत 17 जण जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत चकमकी सुरूच होत्या. (Manipur Violence)

मैतेयीबहुल इम्फाळ खोर्‍यातील बिष्णुपूर आणि डोंगराळ भागातील कुकीबहुल चुराचांदपूर या जिल्ह्यांच्या सीमेवर गुरुवारी कुकी आणि मैतेयींचे दोन गट समोरासमोर आले. प्रारंभी दगडफेक करणार्‍या या जमावांतून एकमेकांवर जोरदार गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलांच्या तुकड्या पोहोचेपर्यंत ही धुमश्चक्री सुरू होती. दुसरी घटना बिष्णुपूरच्या कांगवाई आणि फौगाकचाओ येथे घडली. तेथे आंदोलकांनी सुरक्षा दलांच्या जवानांवरच हल्ला केला. कुकी झोमी समुदायाच्या 35 जणांच्या सामूहिक अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न होताच जमावाने दगडफेक सुरू केली. त्यात आसाम रायफल्स आणि जलद कृती दलाचे जवान जखमी झाले. आंदोलकांतील महिला आणि पुरुषांनी जवानांवर जोरदार हल्ले केले. त्यामुळे सुरक्षा दलाने जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबाराच्या फैरीही झाडल्या. तरीही जमाव चाल करून येत असल्याचे दिसल्यावर अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आली. या प्रकारात एकूण 17 जण जखमी झाले. काही वेळानंतर सुरक्षा दलांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. विखुरलेला जमाव वेगवेगळ्या भागांतून येऊन या सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करीत होता. (Manipur Violence)

सामूहिक अंत्यसंस्कार स्थगित

चुराचांदपूर जिल्ह्यात हिंसाचारात मरण पावलेल्या 35 जणांचे सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा कुकी व झोमी समुदायांनी निर्णय घेतला होता. गुरुवारी हे अंत्यसंस्कार होणार होते. यामुळे पुन्हा हिंसाचाराचा भडका उडण्याची भीती होती. पण मणिपूर उच्च न्यायालयाने या प्रकरणात जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिल्याने सामूहिक अंत्यसंस्कार स्थगित करण्यात आले. (Manipur Violence)

 

    हेही वाचलंत का ? 

 

Back to top button