ISRO : चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर ‘कधी’ उतरणार? ISRO ची माहिती | पुढारी

ISRO : चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर 'कधी' उतरणार? ISRO ची माहिती

पुढारी ऑनलाईन : चांद्रयान-३ चे श्रीहरीकोटा येथील सतिश धवन केंद्रावरून आज दुपारी पृथ्वीच्या कक्षेत यशस्वी प्रक्षेपण झाले. दरम्यान चांद्रयानाने सुरक्षितपणे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. तर सर्व काही ठीक झाल्यास चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेप्रमाणे सायंकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे. चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत ते (ISRO) बोलत होते. यासंदर्भातील वृत्ताचा व्हिडिओ एएनआयने ट्विटरवर दिला आहे.

ISRO: चांद्रयान-३ तयारीचा ‘असा’ होता प्रवास

पुढे सोमनाथ म्हणाले, चांद्रयान-३ मोहिमेच्या तयारी दरम्यान आम्ही पहिल्या वर्षी बघितले की, काय चुका झाल्या. त्यानंतर दुसऱ्या वर्षात त्यामध्ये सुधारणा केली, जेणेकरून हे अधिक चांगले होईल. पुन्हा आम्ही आणखी काय चुका झाल्या होत्या ते पाहिले. कारण काही चुका या छुप्या असतात, ज्या आम्ही समीक्षा आणि चाचणी दरम्यान शोधल्या. चांद्रयान-३ च्या तयारीतील तिसऱ्या वर्षी आम्ही नियोजन आणि तयारी केली. यासाठी मी माझ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो, असेही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

येत्या काही वर्षात भारत एक वैश्विक खेळाडू बनेल-केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

यानंतर अर्थ अँन्ड सायन्स मंत्रालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ही मोहीम पूर्णपणे स्वदेशी असून, यामुळे भारत आत्मनिर्भरतेच्या विचारावर खऱ्या अर्थाने उतरला आहे. येत्या काही वर्षात भारत एक वैश्विक खेळाडू बनेल, तसेच एक प्रमुख म्हणून देखील भारत आपली भूमिका बजावेल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

हा क्षण आपल्यासाठी गौरवास्पद आहे, तसेच हा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा क्षण आहे. भारताला हा अभिमानास्पद क्षण दिल्याबद्दल मी इस्रोच्या सर्व टीमचे आभार मानतो. या मोहिमेसाठी श्रीहरीकोटाचे दरवाजे उघडून, भारताच्या अंतराळ क्षेत्राला सक्षम केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानतो, असे देखील केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button