पुढारी ऑनलाईन: हरियाणा सरकारने राज्यातील अविवाहितांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर सरकारने ४५ ते ६० वयोगटातील कमी उत्पन्न असलेल्या अविवाहितांना मासिक पेन्शन देण्याची घोषणा केली आहे.
हरियाणा सरकारने जाहीर केलेल्या घोषनेनुसार, ज्या व्यक्तीचे वय ४५ ते ६० दरम्यान आहे. अशा व्यक्तींची भविष्यात देखील अविवाहित राहण्याची योजना आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १.८० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा अविवाहित स्त्री-पुरुषांना दरमहा २,७५० रुपये पेन्शन मिळेल. हरियाणात अशी अविवाहित स्त्री-पुरूषांची संख्या जवळपास ६५ हजारांपर्यंत असून, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी २४० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे देखील सरकारने जाहीर केले आहे.
हरियाणातील कलामपुरा (जि. कर्नाल) येथील एका जनसंवाद कार्यक्रमात एका ६० वर्षीय अविवाहित व्यक्तीने केलेल्या तक्रारीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली. तसेच अशा लोकांसाठी सरकार पेन्शन योजना सुरू करणार असून, आम्ही महिनाभरात यासंदर्भातील निर्णय घेऊ असे देखील हरियाणाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी स्पष्ट केले आहे.