Rahul Gandhi defamation case | राहुल गांधींच्या शिक्षेच्या स्थगितीसाठी काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार
![Rahul Gandhi](https://pudhari.news/wp-content/uploads/2023/07/Copy-of-Copy-of-आरक्षण.jpg)
पुढारी ऑनलाईन : ‘मोदी’ आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिलासा मिळालेला नाही. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची त्यांची मागणी गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचाच अर्थ असा की राहुल गांधी यांची लोकसभा खासदारकी रद्दच राहणार आहे. हा राहुल गांधी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची पुनर्विचार याचिका फेटाळणाऱ्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. (Rahul Gandhi defamation case)
राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करणारी त्यांची याचिका फेटाळल्यानंतर दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर राहुल यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालाचे भाजपने स्वागत केले आहे. ”आम्ही न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करतो. राहुल यांनी आता विचार करावा आणि इतिहास रचू नये, असे भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्याबाबत ट्रायल कोर्टाचा दोषी ठरवण्याचा आदेश योग्य आहे. या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या विरुद्ध किमान १० गुन्हेगारी खटले प्रलंबित असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, राहुल गांधी यांना अवमानना प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसल्याने वर्ष २०२४ मध्ये त्यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुजरात उच्च न्यायालयाने ‘मोदी आडनाव’ टिप्पणीविरोधातील मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगितीस नकार देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने २ मे रोजी गांधींच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण केली आणि आदेश राखून ठेवला होता. राहुल गांधींच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान असा युक्तिवाद केला होता की, जामीनपात्र, अदखलपात्र गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा म्हणजे त्याची लोकसभेची खासदारकी कायमची जाऊ शकते.”
‘मोदी’ आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणार्या राहुल गांधींच्या अर्जावर आज गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत प्रचारक यांनी निकाल दिला. (Rahul Gandhi defamation case)
‘मोदी’ आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याच्या प्रकरणात सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासाठी हा जबर धक्का होता.
अपात्र ठरण्यापूर्वी राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार होते. वर्ष २०१९ मध्ये गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरून वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुजरातमध्ये अवमानना खटला दाखल करण्यात आला होता. सुरत येथील न्यायालयाने गांधी यांना या प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. वरच्या न्यायालयात अपील करण्यासाठी शिक्षेला एक महिन्याची स्थगिती देण्याबरोबरच गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने जामीनही दिला होता. (Rahul Gandhi defamation case)
Will move SC against Gujarat HC order dismissing Rahul Gandhi’s plea to stay his conviction in defamation case: AICC gen secy K C Venugopal
— Press Trust of India (@PTI_News) July 7, 2023
हे ही वाचा :