भारताच्या पराभव जिव्हारी; इस्‍लामपूरमध्‍ये तरुणांनी रस्‍त्‍यावर फाेडला टीव्ही | पुढारी

भारताच्या पराभव जिव्हारी; इस्‍लामपूरमध्‍ये तरुणांनी रस्‍त्‍यावर फाेडला टीव्ही

इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा :

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी रात्री भारत-पाकिस्तान संघात झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. यामुळे नाराज झालेल्या इस्लामपूर येथील क्रिकेट शौकिन तरुणांनी रस्त्यावर टीव्ही फोडून आपला राग व्यक्त केला. हा प्रकार येथील पाटील गल्लीत रविवारी रात्री उशिरा घडला.

भारत-पाकिस्‍तान क्रिकेट मॅच म्‍हटले की, क्रिकेटप्रेमींना पर्वणीच असते. या सामन्याविषयी जनसामान्यात कमालीच्या तीव्र भावना असतात. त्‍यामुळे क्रिकेट शौकिनांच्या नजरा रविवारी होणाऱ्या सामन्याकडे लागल्‍या होत्‍या. त्‍यातच कोल्‍हापूर आणि इचलकरंजीमध्ये पोलिसांनी सामन्यानंतर जल्‍लोष करण्यासाठी शहरातील सार्वजनिक चौकात बंदी घातली होती. पोलिसांनी कोल्‍हापुरातील शिवाजी चौकात बंदोबस्‍त तैनात केला होता.

आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर बऱ्याच सामन्यांमध्ये भारताने पाकिस्‍तानला धुळ चारली आहे. त्‍यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्‍यांनी आधीपासूनच फटाके आणून जल्‍लोषाची तयारी केली होती. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भारत- पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. यामुळे भारतीय संघाचे चाहते चांगलेच संतापले होते.

असाच काहीसा राग सांगलीतील चाहत्‍यांनी व्यक्‍त केला. भारतीय क्रिकेट संघावरील राग चाहत्‍यांनी टीव्हीवर काढला. येथील पाटील गल्लीतील तरुणांनी टीव्ही रस्त्त्यावर आणून दगड, काट्या घालून फोडून टाकत आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत – पाकिस्तान सामन्यानंतर शहरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून शहरात ठिकठिकाणी पोलीस बदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही हा प्रकार घडल्याने शहरात याची चर्चा सुरु होती.

हेही वाचलं का ?

Back to top button