कडेकोट बंदोबस्तात अमित शहा जम्मू-काश्‍मीर दौऱ्यावर | पुढारी

कडेकोट बंदोबस्तात अमित शहा जम्मू-काश्‍मीर दौऱ्यावर

श्रीनगर, पुढारी ऑनलाईन

कलम ३७० हटविल्यानंतर प्रथमच गृहमंत्री अमित शहा कडेकोट बंदोबस्तात जम्मू – काश्‍मीर दौऱ्यावर गेले आहेत. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. यानंतर त्‍यांनी राजभवानात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहा यांचा हा तीन दिवसांचा दौरा असून श्रीनगर येथून शारजाहसाठी थेट विमानसेवेचे उद्घाटनही होणार आहे.

शहा यांनी आज सीआईडी इन्स्पेक्टर परवेज अहमद यांच्या कुटुबीयांची भेट घेतली. घाटीमध्ये पोहोचल्यानंतर नौगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी परवेज अहमद यांच्या निवासस्थानी गेले. परवेज यांचा जून २०२१ मधील हल्ल्यात मृत्यू झाला होता. यावेळी परवेज यांची पत्नी फतिमा यांच्याशी चर्चा करून त्यांना सरकारी नोकरीचे पत्रही प्रदान केले. यावेळी त्यांच्यासोबत उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, डीजीपी दिलबाग सिंग उपस्थित होते.

तीन दिवसांच्या दौऱ्यात शहा जम्मू – काश्‍मीर मधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. त्याबरोबरच विविध विकास कामांची पाहणीही करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून टार्गेट किलिंग होत असून याबाबत बैठकांमध्ये मंथन होणार आहे. दौऱ्याच्या पार्श्वूभमीवर राजभवन आणि श्रीनगर विमानतळावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. गृहमंत्रालयासोबतच एनआयए, आईबी, सीआरपीएफ, बीएसएफचे वरिष्ठ अधिकारीही श्रीनगरमध्ये पोहोचले आहेत.

शहा २४ ऑक्टोंबर रोजी भगवतीनगर येथे सभा घेणार आहे. तसेच लाभार्थी सभेत ते केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या ८० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि योजनेसंबंधी कागदपत्रांचे वाटप करणार आहेत. त्यांच्या हस्ते जम्मू येथील आयआयटीच्या नवीन ब्लॉकचे उद्घाटन होणार आहे. तसेच प्रतिनिधी मंडळांशी ते चर्चाही करणार आहेत.

वेगवेगळ्या प्रतिनिधी मंडळांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफचे महासंचालक पंकज कुमार सिंग शुक्रवारीच श्रीनगरला पोहोचले आहेत. दल लेकच्या आसपास कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून या परिसराला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. या परिसरात गस्तही वाढविली आहे.

अमित शहा जम्मू दौऱ्यावर : रॅली सरकारी

जम्मू येथे एक रॅली आयोजित केली असून या रॅलीत भाजपचा झेंडा नसेल. कार्यक्रमस्थळी टीव्ही स्क्रीन लावले आहेत. त्यामुळे नागरिकांना हा कार्यक्रम सहज पाहता येईल.

हेही वाचलं का?  

Back to top button