अजित पवार म्हणाले ६४ साखर कारखान्यांच्या विक्रीव्यवहारांचे काय? | पुढारी

अजित पवार म्हणाले ६४ साखर कारखान्यांच्या विक्रीव्यवहारांचे काय?

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तेरा वर्षांत राज्यातील 64 साखर कारखाने आणि एका सूतगिरणीची विक्री मिळेल त्या किमतीत झाली. एक कारखाना अवघ्या 3 कोटी 46 लाखांत विकला गेला. सरकार, राज्य सहकारी बँक आणि जिल्हा बँकांनी हे व्यवहार केल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्‍वर साखर कारखान्यासंदर्भात झालेले आरोप शुक्रवारी फेटाळून लावले. त्यांनी या 64 साखर कारखान्यांची यादीच पत्रकार परिषदेत सादर केली. दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार ‘जरंडेश्‍वर’च्या व्यवहारातील मूळ मुद्द्याला बगल देत आहेत, असा आरोप केला.

किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी जरंडेश्‍वर कारखान्याच्या विक्रीवरून गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पवार यांनी पुणे विभागीय आयुक्‍त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कारखान्यांच्या व्यवहारांची कुंडलीच मांडली. ते म्हणाले की, 64 सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कंपन्यांनी विकत घेतले. काही लोकांनी चालवायला घेतले, काहींनी इतरांना चालवायला दिले. ही वस्तुस्थिती असताना काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. या सर्व प्रकरणाचा अतिरेक झाल्याने मी खुलासा करीत आहे.

‘जरंडेश्‍वर’च्या व्यवहारात काही म्हणाले, 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला, आणखी काहींनी 10 हजार कोटींचा भ—ष्टाचार झाल्याचा आरोप केला. हा व्यवहार झाला तेव्हा आघाडी सरकार सत्तेवर होते. नंतर आमचे सरकार गेले. युतीचे सरकार आले. त्यांनी सीआयडीला चौकशी करायला लावली. त्यात काही निष्पन्‍न झाले नाही. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानेही (एसीबी) चौकशी केली. त्यातही काही स्पष्ट झाले नाही. सहकार विभागानेही चौकशी केली. त्यातूनही काही बाहेर आले नाही. गेल्या काही दिवसांत काहीजण बेछूट आरोप करीत आहेत. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.

न्यायालयाकडूनच ‘जरंडेश्‍वर’च्या लिलावाचे निर्देश

जरंडेश्‍वर साखर कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पडल्याचा दावा करताना अजित पवार यांनी आतापर्यंत विक्री झालेल्या साखर कारखान्यांची यादीच जाहीर केली. सुंदरबन को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही मुंबईतील सोसायटी आहे. त्यांनी न्यायालयात ‘जरंडेश्‍वर’च्या विक्रीप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने ‘जरंडेश्‍वर’च्या लिलावाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते, असे त्यांनी सांगितले.

जरंडेश्‍वर कारखान्यासंदर्भात माझ्या नातेवाईकांवर आरोप केले जात आहेत. मात्र, हे लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जरंडेश्‍वर कारखाना सर्वप्रथम मुंबई येथील गुरू कमॉडिटी कंपनीने विकत घेतला होता. त्यानंतर हा कारखाना बीव्हीजी समूहाने विकत घेतला होता. त्यासाठी जरंडेश्‍वर शुगर लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली होती. मात्र, तोटा झाल्याने त्यांनी हा कारखाना दुसर्‍या कंपनीला विकून टाकल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्य सहकारी बँकेने सरफेशी कायदा 2002 अंतर्गत विक्री केलेले कारखाने (रक्‍कम कोटी रुपयांमध्ये)
1) राम गणेश गडकरी, नागपूर – 1,295
2) श्री अंबादेवी सहकारी साखर कारखाना, अमरावती – 1,525
3) महात्मा सहकारी साखर कारखाना, वर्धा – 1,410
4) वैनगंगा, भंडारा – 1,410
5) शंकर, यवतमाळ – 1,925
6) अकोला, अकोला – 1,710
7) कोंडेश्‍वर, अमरावती – 1,472
8) शंकर, नांदेड – 1,475
9) जरंडेश्‍वर, सातारा – 6,675
10) नरसिंह, परभणी – 4,025
11) बालाघाट, लातूर – 3,136
12) पुष्पदंतेश्‍वर, नंदुरबार – 4,548
13) राजे विजयसिंह डफळे शेतकरी, सांगली – 4,786
14) जालना, जालना – 4,231
15) हुतात्मा जयवंतराव पाटील, नांदेड – 4,851
16) जयअंबिका, नांदेड – 3,350
17) कन्‍नड, औरंगाबाद – 5,020
18) श्रीराम, नागपूर – 1,197
19) घृष्णेश्‍वर, औरंगाबाद – 1,862
20) बागेश्‍वरी, जालना – 4,410
21) संत मुक्‍ताबाई – जळगाव – 3,085
22) प्रियदर्शनी, लातूर – 6,075
23) निनाईदेवी, सांगली – 2,430
24) नगर तालुका, अहमदनगर – 3,825
25) शिवशक्‍ती आदिवासी, बुलडाणा – 1,899
26) पारनेर, अहमदनगर – 3,175
27) सुधाकरराव नाईक, यवतमाळ – 4,395
28) जय शिवशंकर, नांदेड – 2,804
29) श्री संत नाथ, सोलापूर – 1,323
30) तासगाव, सांगली – 3,767
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी व इतर बँकांनी
सरफेशी कायद्यांंतर्गत विक्री केलेले कारखाने
31) गिरणा, नाशिक – 2,755
32) यशवंत, सांगली – 5,651
33) जगदंबा, अहमदनगर – 2,800
34) श्री दत्त, आसुर्ले-पोर्ले, कोल्हापूर – 10,800
35) इं. गांधी. भा. म., कोल्हापूर – 9,300
36) बेलगंगा, जळगाव – 3,922
शासन मान्यतेने विक्री करण्यात आलेले कारखाने
37) शेतकरी, अमरावती – 336
38) गोदावरी दुधना, परभणी – 2,375
39) सिंदखेडा, धुळे – 1,090
40) मराठवाडा, हिंगोली – 588
41) बाराशिव हनुमान, हिंगोली – 2,800
42) संजय, धुळे – 352
कारखान्यांनी त्यांच्याच स्तरावर विक्री केलेले कारखाने
43) पूर्णा, हिंगोली – 3,803
44) भाऊराव चव्हाण, युनिट 3, नांदेड – 5,121
45) भाऊराव चव्हाण, युनिट 4, नांदेड – 9,200
भाडेतत्त्वावर देण्यात आलेले कारखाने
1) श्रीराम, सातारा
2) खंडाळा तालुका, सातारा
3) शिवशक्‍ती, उस्मानाबाद
4) प्रतापगड, सातारा
5) रयत, सातारा
6) श्री गणेश, अहमदनगर
7) संत एकनाथ, औरंगाबाद
8) सिद्धेश्‍वर, औरंगाबाद
9) कर्मवीर काकासाहेब वाघ, नाशिक
10) चोपडा शेतकरी, जळगाव
11) आदिवासी, नंदुरबार
12) श्री तुळजाभवानी शेतकरी, उस्मानाबाद
13) उदयसिंह गायकवाड, कोल्हापूर
14) रयत, सातारा
15) भाऊसाहेब बिराजदार, उस्मानाबाद
16) बाणगंगा, उस्मानाबाद
17) वसंतदादा पाटील, सांगली
18) केदारेश्‍वर, अहमदनगर
19) जिजामाता, बुलडाणा
20) सांगोला तालुका, सोलापूर

Back to top button