PM Appreciation : देशाने ओलांडला १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण | पुढारी

PM Appreciation : देशाने ओलांडला १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

देशाने गुरुवारी १०० कोटी लसीकरणाचा विक्रम नोंदवला. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात वेगाने, अत्यंत सुव्यवस्थितरित्या लसीकरण सुरू असल्याने केंद्र सरकारकडून समाधान (PM Appreciation) व्यक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये जून महिन्यातच १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण ‘शतका’च्या कोरोना योद्धांसह देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. ‘भारत इतिहास लिहतोय. विज्ञान, उद्यम आणि १३० कोटी देशवासियांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे आम्ही भारतीय साक्षीदार आहोत. १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याने भारताचे अभिनंदन. डॉक्टर, परिचारिका आणि ज्यांनी हे कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्या सर्वांचे आभार’ अशी भावना पंतप्रधानांनी (PM Appreciation) ट्विटरवरून व्यक्त केली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानूसार देशात आतापर्यंत १८ वर्षावरील ७५ % नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, ३१ टक्क्यांहून अधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे. कोविन अ‍ॅपनुसार ७० कोटी ८३ लाख ८८ हजार ४८५ जणांना पहिला डोस तर, २९ कोटी १८ लाख ३२ हजार २२६ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सध्या देशात ७४, ५८३ लसीकरण केंद्र असून ७२, ३९६ सरकारी आणि २, १८७ खाजगी केंद्र आहेत.

भारतात दररोज सरासरी ३५ लाख नागरिकांचे लसीकरण

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात दररोज सरासरी ३५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारता खालोखाल अमेरिकेत १३ लाख आणि चीनमध्ये ७ लाख नागरिकांचे दैनंदिन लसीकरण करण्यात येते.

भारतापाठोपाठ युरोप ८३ कोटी, उत्तर अमेरिका ६६ कोटी, दक्षिण अमेरिका ४८१ कोटी, आफ्रिका १७६ कोटी तसेच ओशिनियात ४१ कोटींचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात लसीकरण सुरू करण्यात आल्यानंतर पहिल्या ८५ दिवसांमध्ये १० कोटींचा टप्पा गाठवण्यात आला. गेल्या १९ दिवसांमध्ये १० कोटींचे लसीकरण करण्यात आले.

देशात २१ जून पासून सार्वत्रिक लसीकरण सुरू करण्यात आली होती. २१ जून पूर्वी देशात दररोज सरासरी १८ लाख डोस देण्यात येत होते. पंरतु, २१ जून नंतर दररोज सरासरी ६० लाख लसीकरण करण्यात आले. देशातील जवळपास ७५% पात्र लोकसंख्येला पहिला डोस लावण्यात आला आहे. ८ राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये १०० टक्के लोकसंख्येला पहिला डोस लावण्यात आला आहे.

४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला डोस लावण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात १००% लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे. केंद्रशासित लडाख,जम्मू-काश्मीर, दादरा-नगर-हवेली-दमन-दीव तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम, गोवा तसेच लक्षद्वीप मध्ये १००% लोकसंख्येला लसीचा पहिला डोस लावण्यात आला आहे. देशात १७ सप्टेंबरला विक्रमी २.५ कोटी लसीकरण करण्यात आले. यादिवशी दर तासांना १५.६२ लाख लसीकरण करण्यात आले. तर, दर मिनिटांनी २६ हजार आणि दर सेकंदाला ४३४ लसीकरण करण्यात आले. देशात ४८.१% महिलांचे, तर ५१.९% पुरूषांचे लसीकरण करण्यात आले.

पहा व्हिडीओ : कोरोना उपचारावरील वाढता खर्च; मेडिक्लेमचे काय आहेत पर्याय?

Back to top button